Judge Handwritten Order Pudhari
पुणे

Pune Court Employees Strike: न्यायालयात कर्मचारीच गायब! न्यायाधीशांनी स्वतः हाताने लिहिला आरोपीच्या कोठडीचा आदेश

पुणे जिल्हा न्यायालयात संपाचा पहिल्याच दिवशी परिणाम; जामीन अर्जाची सुनावणीही पुढे ढकलली, ‘तारीख पे तारीख’ची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: न्यायाधीश न्यायासनावर, वकील युक्तिवादासाठी सज्ज अन् आरोपीही हजर... मात्र, कर्मचारीच गायब! न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (दि. १७) पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात असे चित्र पाहायला मिळाले.

लघुलेखकही संपात सहभागी झाल्याने न्यायाधीशांना चक्क हाताने आदेश लिहून आरोपीला पोलिस कोठडी सुनवावी लागली. तर, जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचा न्यायालयातील हा अनुभव ॲड. अजित पवार यांनी सांगितला.

बावधन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, संपामुळे कर्मचारी न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलिसांनी कोर्टरूममधील हजर असलेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कागदपत्रे जमा करीत न्यायालयापुढे सादर केली.

आदेश टंकलिखित करण्यासाठी लघुलेखकही नसल्याने न्यायाधीशांनी स्वतः हाताने आदेश लिहून आरोपीला पोलिस कोठडी सुनावली. दुसरीकडे, ॲड. पवार यांच्या एका आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणीही संपामुळे होऊ शकली नाही. त्यासाठी बुधवारी (दि. १८) पुढील तारीख देण्यात आली.

संप बुधवारीही सुरू राहणार असल्याने न्यायालयीन कामकाजाची कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संप मिटेपर्यंत न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांच्या वाट्याला आता 'तारीख पे तारीख' येण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT