Couple romance on moving car Pune
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात रविवारी (दि.१०) सकाळी एक हटके घटना पाहायला मिळाली. भर रस्त्यात धावत्या कारच्या छतावर बसून एका तरुण-तरुणीने स्टंटबाजी आणि रोमान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
खराडी भागातील मुख्य रस्त्यावर एका कारच्या रूफटॉपवर बसलेले तरुण आणि तरुणी सार्वजनिक ठिकाणी स्टंटबाजी करताना दिसले. या दोघांनी चालू कारच्या छतावर बसून एकमेकांशी जवळीक साधली, ज्यामुळे इतर वाहनचालक आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नागरिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला.
वाहतूक सुरक्षेच्या नियमांचा भंग करत केलेल्या या स्टंटमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली असून, संबंधित तरुण-तरुणींचा शोध सुरू केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अशा बेजबाबदार वर्तनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या स्टंटमुळे इतरांच्या जीवितास धोका निर्माण होतो, असे मत व्यक्त केले आहे. काहींनी तरुण पिढीच्या वाढत्या स्टंटप्रवृत्तीवर चिंता व्यक्त केली आहे. ही घटना केवळ मनोरंजन किंवा प्रसिद्धीसाठी स्टंट करण्याचे धाडस किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय देणारी आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शहरातील वाहतूक सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी आणि जनजागृतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.