Pune Couple Bike romance Viral Video
पुणे : प्रेम आंधळं असतं म्हणतात, पण पुण्यातील एका प्रेमीयुगुलाने या म्हणीला वेगळ्याच पातळीवर नेलं आहे. धावत्या दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीवर प्रियकराला बिलगून उलटी बसलेली तरुणी... आणि तिला घेऊन सुसाट वेगाने बाईक चालवणारा तरुण..., आजूबाजूच्या जगाचे भान हरपून त्यांचा सुरू असलेला जीवघेणा रोमान्स पाहून पुणेकर संतापले आहेत. धावत्या दुचाकीवरच्या प्रेमक्रीडेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
हा धक्कादायक प्रकार पुण्यातील शिंदेवाडी भागातून जाणाऱ्या खेड-शिवापूर परिसरातील रस्त्यावरचा आहे. एका धावत्या दुचाकीवर एक तरुण-तरुणी अत्यंत धोकादायक स्थितीत बसले होते. तरुणी दुचाकीच्या चक्क पेट्रोल टाकीवर तरुणाच्या दिशेने तोंड करून, त्याला मिठी मारून बसली होती, तर तरुण तिला सावरत दुचाकी चालवत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तर त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवले. मात्र, या जोडप्याला त्याची यत्किंचितही पर्वा नव्हती. ते आपल्याच प्रेमाच्या दुनियेत मग्न होऊन प्रेमक्रीडा करत होते.
या व्हिडीओमध्ये तरुणीने चेहरा स्कार्फने झाकलेला आहे. रस्त्यावरून जाणारे अनेकजण या दृश्याने चक्रावले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. 'आता पुण्यात हेच बघायचं बाकी होतं का?' असा संतप्त सवाल अनेकांकडून विचारला जात आहे. अनेकांनी या जोडप्याच्या बेजबाबदार आणि निर्लज्ज वागण्यावर तीव्र टीका केली आहे. "हा प्रेमाचा अविष्कार आहे की अश्लीलतेचा कळस?" अशी टीका नेटकऱ्यांकडून होत आहे.
या व्हायरल व्हिडिओची पुणे पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. व्हिडिओच्या आधारे या प्रेमीयुगुलाची ओळख पटवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणे, जीवघेणा स्टंट करणे आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे यांसारख्या गंभीर आरोपांखाली त्यांच्यावर कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे मात्र पुण्यातील सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेचा आणि तरुणाईच्या बेजबाबदार वागण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.