पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात 'एमएनजीएल'ने सीएनजीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
पुणे शहर (पिंपरी-चिंचवड आणि चाकण, तळेगाव व हिंजवडी या लगतच्या परिसरासह) येथील वाहन क्षेत्रासाठीच्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस अर्थात सीएनजीच्या किरकोळ दरात प्रतिकिलो दोन रुपयांची (करांसह) वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून सीएनजीची किरकोळ विक्री किंमत ९७.७५ रुपये प्रतिकिलो इतकी होणार आहे; तर घरगुती वापरासाठीच्या पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि त्यामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मार्गे होणाऱ्या एलएनजी वाहतुकीत निर्माण झालेला अडथळा यांमुळे जागतिक स्तरावर 'स्पॉट एलएनजी'च्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. जुलै २०२६ पासून पश्चिम आशियातील संकट पुन्हा बळावल्यामुळे जागतिक ऊर्जा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' मार्गावरील एलएनजी वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. याचा परिणाम म्हणून संकटपूर्व काळाच्या तुलनेत जागतिक एलएनजीच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यातच हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोपमध्ये नैसर्गिक वायूचा साठा (इन्व्हेंटरी) उभारण्याची निकड निर्माण झाल्याने जागतिक एलएनजी बाजारपेठेतील तणाव आणखी वाढला आहे.
या आव्हानात्मक काळात देशाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि ग्राहकांची वाढती मागणी यांमुळे भारतात सीएनजीच्या वापरातही लक्षणीय वाढ होत आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सीएनजी क्षेत्रासाठी लागणाऱ्या वायूचा (इनपुट गॅस) मोठा हिस्सा आयात केलेल्या 'स्पॉट एलएनजी'द्वारे मिळवला जात आहे. जागतिक स्तरावरील वाढीव किमती आणि 'स्पॉट कार्गो'वरील वाढलेले अवलंबित्व यांमुळे सीएनजी क्षेत्रासाठी लागणाऱ्या वायूच्या खरेदी खर्चात (इनपुट गॅस कॉस्ट) मोठी वाढ झाली आहे.
नैसर्गिक वायू वितरण क्षेत्रातील एक जबाबदार कंपनी म्हणून, वायूच्या खरेदी खर्चात झालेली मोठी वाढ आणि त्याचे ग्राहकांवर होणारे परिणाम यांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी एमएनजीएलने वाढलेल्या खर्चाचा मोठा हिस्सा स्वतः सोसला आहे, तसेच या किरकोळ दरवाढीद्वारे वाढीव खर्चाचा केवळ काही भाग ग्राहकांवर टाकला असल्याचा दावा केला आहे.