पुणे : महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक आज (दि.१८) दुपारी आयोजित केली आहे. ही बैठक मुंबईतील टिळक भवनात होणार असून त्यामध्ये पुणे शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकांतील अपयश, माजी आमदारांचा पक्षत्याग आणि युवक नेत्यांची नाराजी यामुळे काँग्रेसची संघटनात्मक स्थिती डळमळीत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदलांच्या पाहणीसाठी पक्षाचे निरीक्षक सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गेल्या सोमवारी (९ जून) पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्ते, शिष्टमंडळे व इच्छुकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्या. मुंबईत होणार्या उद्याच्या बैठकीत त्यांच्या अहवालावर चर्चा होऊन निर्णय होईल, असे ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. त्यामुळे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यावरच पुन्हा जबाबदारी टाकली जाते की, शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्या जुन्या जाणत्या अनिल सोंडकर, संजय बालगुडे, सुनील मलके, अजित दरेकर यांच्यावर की, अविनाश बागवे,चंदु कदम या तरुण नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात शहराध्यक्षाची माळ पडते, याबाबत उत्सुकता आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचा सामना करण्यासाठी नेतृत्त्वातील पोकळी भरून पक्ष संघटना वाढीसाठी तन, मन आणि धनाने काम करणारा कार्यक्षम नेता पक्षाने निवडावा, अशी निष्ठावान कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. दादर येथील टिळक भवनात आज दुपारी होणार्या या बैठकीत पुण्याबरोबर पिंपरी व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशीही प्रांताध्यक्ष स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. त्यामुळेच या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आजी व माजी अध्यक्षांबरोबरच माजी आमदार, जिल्ह्यातील विधानसभेचे उमेदवार, ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, महानगरपालिकेचे माजी सदस्य, जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींसह आगामी निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनाही पाचारण करण्यात आले आहे.
विठ्ठलराव लडकत : 1992 ते 1995
य. ग. शिंदे : एक दिवस
बाळासाहेब शिवरकर : 1995 ते 1997
मोहन जोशी : 1997 ते 2004
संगिता देवकर : फेब्रुवारी 2004 ते एप्रिल 2004
अॅड. अभय छाजेड : 2004 ते 2016
रमेश बागवे : 2016 ते 2022
अरविंद शिंदे : जून 2022 पासून आजपर्यंत