पुणे : दिवाळीच्या काळात शहरात रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्याने रक्तटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. कार्यालये, महाविद्यालये बंद असल्याने अनेक संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित केली नाहीत, त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये साठा कमी झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे.(Latest Pune News)
राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी)कडे नोंदणीकृत असलेल्या एकूण 373 रक्तपेढ्यांपैकी 57 सार्वजनिक आणि खाजगी रक्तपेढ्या पुणे जिल्ह्यात आहेत. या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्तसाठा कमी झाला आहे. यामध्ये मेट्रो ब्लड बँक, ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, केईएम हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल आणि भारती विद्यापीठ रुग्णालय आदींचा समावेश आहे.
सध्या पुण्यात दररोज सुमारे 1500 रक्तपिशव्यांची गरज आहे. पण उपलब्धता फक्त 400 ते 600 पिशव्यांपर्यंत मर्यादित आहे.
परिणामी, रुग्णालयांमध्ये रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये रक्ताची उपलब्धता खूप कमी आहे. विशेषतः ए पॉझिटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या पिशव्यांचा तुटवडा जास्त जाणवत आहे. रक्तदान केवळ काही मिनिटांचे काम असून, त्यामुळे तीन रुग्णांचे जीव वाचू शकतात. त्यामुळे तरुणांनी या सामाजिक जबाबदारीत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘रक्ताचे नाते’ट्रस्टने केले आहे.
सणांच्या काळात फारच थोडी रक्तदान शिबिरे झाली आणि त्यातही दात्यांचा प्रतिसाद कमी होता. रुग्ण आणि रुग्णालयांकडून रक्तदान शिबिरांविषयी चौकशीचे अनेक फोन येत आहेत. त्यामुळे नियमित रक्तदान करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. पुणेकरांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान करावे आणि आपल्या परिसरात शिबिरे आयोजित करावी.राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट