Accident Survey Pudhari
पुणे

Pune Black Spot Accident Survey: पुण्यात 31 ब्लॅक स्पॉटचा संयुक्त पंचनामा; नवले पूलसह धोकादायक ठिकाणांचा अभ्यास

आरटीओ आणि रस्ता सुरक्षा पथकांकडून जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून 25 जूनपर्यंत सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्ह्यातील आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (पुणे) कार्यक्षेत्रातील वारंवार अपघात होणाऱ्या धोकादायक ठिकाणांची (ब्लॅक स्पॉटची) संयुक्त पाहणी करण्याचे आदेश पुणे आरटीओ अधिकाऱ्यांनी ताफ्यातील वायुवेग पथकांना दिले आहेत. त्याअंतर्गत प्रसिद्ध नवले पुलासह चांदणी चौक, कात्रजसह तब्बल ३१ ब्लॅक स्पॉटचा एकप्रकारे पंचनामाच होणार असून, त्याचा अहवाल २५ जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यासाठी विशेष पाच रस्ता सुरक्षा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेले रस्ता सुरक्षा पथक, संबंधित पोलिस विभाग, रस्ता निर्मितीशी संबंधित यंत्रणा आणि लाइफ फाउंडेशन व ब्लूमबर्ग या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी एकत्रितपणे या ब्लॅक स्पॉट्सला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या संयुक्त पाहणीचा सविस्तर अहवाल २५ जून कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आगामी २९ जून २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हा अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केला जाणार आहे.

कात्रज व परिसर

एनएच-4 कात्रज चौक, दरी पूल, कात्रज नवीन बोगदा

नगर रोड व विमाननगर

एनएच-५१ एफ तुळापूर फाटा, पेरणे फाटा, एनएच-७५३ टाटा गार्ड रूम चौक, खराडी बायपास चौक, खराडी नकाशानंतरचा चौक, विमाननगर चौक.

कोथरूड व वाकड परिसर

चांदणी चौक, ऑडि शोरूम, सुतारवाडी ब्रिज, रंगा पंजाब हॉटेल.

हडपसर व लोणी काळभोर परिसर

एनएच-६५ रिलायन्स चौक (हडपसर/वानवडी), आयबीएम कंपनीसमोर सासवड रोड, कदमवाकवस्ती, थेऊर फाटा चौक, बोरकर वस्ती, उरुळी कांचन

कोंढवा व मुंढवा

ओआर-पुंडलीक टिळेकरनगर चौक, धर्मावत पेट्रोल पंप, ओआर-मुंढवा रेल्वे उड्डाणपूल

अहवालात या ५ प्रमुख गोष्टींचा समावेश असणार...

  • ब्लॅक स्पॉट ठिकाणाचे नाव व अचूक पत्ता.

  • सदर ठिकाणी कोणत्या कारणामुळे वारंवार अपघात होत आहेत, याचे संपूर्ण विश्लेषण.

  • अपघात रोखण्यासाठी तातडीने करावयाच्या तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना.

  • भविष्यातील सुरक्षिततेसाठी करावयाच्या दीर्घकालीन उपाययोजनांची संपूर्ण माहिती.

  • संबंधित विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्ग किंवा रस्त्यांचा संयुक्त पाहणी ठिकाणाचा नकाशा.

या विशेष मोहिमेसाठी एकूण ७ रस्ता सुरक्षा पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीसह हा अहवाल थेट माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीसाठी पाठवला जाणार आहे. त्यामुळे या कामाला प्रथम प्राधान्य देऊन आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत.
स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT