पुणे

पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील जुनी उंब्रजपांद रोडवरील कुणबी शिवारात भरधाव दुचाकीवरून चाललेल्या दुचाकीस्वारावर अचानक बिबट्याने झेप घेतल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

या अपघातात दुचाकीस्वाराचा एक पाय गाडीच्या खाली अडकल्यामुळे दुचाकीस्वाराच्या पायाचे दोन तुकडे झाले आहेत. गोरक्षनाथ बबन दुधवडे (वय ४४, रा. कुणबी शिवार ओतूर, ता. जुन्नर) असे जखमी झालेल्या दुचास्वाराचे नाव असून ही घटना गुरुवारी (दि. ४) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. दुधवडे हे ओतूरच्या आठवडे बाजारातून खरेदी करून आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली. याबाबत ओतूर वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून या शिवारात वनविभागाने पिंजरा लाऊन ठेवला आहे; मात्र बिबट्या या पिंजऱ्याला दाद देत नसून तो खुलेआम वावरत आहे. कधी दिवसा तर कधी रात्री तो वावरताना नागरिकांना दिसतो. कांदा चाळीचे वेल्डिंग करणारे कामगार भरदिवसा बिबट्या दिसल्याने पळून गेले होते. त्याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे. दरम्यान जखमी झालेला इसम हा आदिवासी समाजापैकी असून त्यास वनविभागाच्या वतीने भरपाई मिळणे अत्यंत गरजेचे असून येथील स्थानिक नागरिक भरत तांबे व विठ्ठल घुले यांनी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

SCROLL FOR NEXT