पुणे: डीजीसीने दिलेल्या मान्यतेमुळे येत्या २५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी वेळापत्रकाअंतर्गत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्याहून भुवनेश्वरसाठी थेट विमानसेवा सुरू करत आहे.
ही विमानसेवा इंडिगो कंपनीची असणार आहे, अशी माहिती पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली. या नव्या विमानसेवेमुळे विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन हिवाळी वेळापत्रकानुसार, विमान कंपन्यांनी पुणे विमानतळावरील एकूण २३५ दैनंदिन स्लॉटपैकी २१६ स्लॉट स्वीकारले आहेत. सध्या पुणे विमानतळावरून ३५ वेगवेगळ्या ठिकाणांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध असून, या हिवाळी वेळापत्रकामुळे प्रवाशांना अधिक पर्याय मिळणार आहेत.
याच हिवाळी वेळापत्रकाचा एक भाग म्हणून, इंडिगो कंपनी २५ ऑक्टोबरपासून पुणे ते भुवनेश्वरदरम्यान नवीन दैनिक थेट विमानसेवा सुरू करणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक आणि आयटी हब असलेल्या पुण्याच्या ओडिशाची राजधानी भुवनेश्वरसोबतचा संपर्क अधिक सुदृढ होईल.
या नवीन विमानसेवेमुळे पुणे आणि भुवनेश्वरमधील संपर्क वाढेल. तसेच व्यवसाय, पर्यटन आणि शिक्षणाला चालना मिळून प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होईल. पुणे विमानतळ सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री