पुणे: हिंगणे खुर्द (सर्वे क्र. 23) आनंद विहार परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगरफोड करून अनधिकृत उत्खनन आणि प्लॉटिंग सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. बीडीपी झोनमध्ये येणाऱ्या या भागात नियमांची पायमल्ली करत हजारो बास गौणखनिज (दगड-माती) उत्खनन केले जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांनी केला आहे. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ गुन्हा दाखल करून उत्खनन थांबवावे, अन्यथा तीव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Latest Pune News)
घरत यांनी या संदर्भात महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग, झोन-2 कार्यालय आणि सिंहगड पोलीस ठाणे येथे निवेदन दिले आहे. संबंधितांवर यापूर्वीही टेकडी फोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आणि दिवाळी सुट्ट्यांचा फायदा घेत पुन्हा त्याच ठिकाणी उत्खनन सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात पुन्हा तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घरत म्हणाले, “या बेकायदेशीर उत्खननामुळे राज्य शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. बीडीपी झोनमधील हा परिसर पाचगाव, पर्वती व तळजाईच्या आरक्षित जंगलालगत आहे. त्यामुळे तेथील वन्यजीव, पक्षी आणि प्राणी यांच्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच डोंगरफोडीमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली असून, पुण्याचे हरित आणि डोंगराळ सौंदर्य नष्ट होत आहे.
रायगडमधील तळये (2021), माळीण (2014) आणि इर्शाळवाडी (2023) येथील भूस्खलनाच्या दुर्घटनांनी डोंगरफोडीचे भयावह परिणाम दाखवून दिले आहेत. पुण्यातील तळजाई आणि सिंहगड परिसरातही असे प्रकार वारंवार होत आहेत, तरी प्रशासनाची निष्क्रियता धोकादायक ठरत आहे. पुण्याच्या हरित पट्ट्यांचे आणि डोंगरांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असून, प्रशासनाने तत्काळ कठोर कारवाई करावी,” अशी मागणीदेखील घरत यांनी केली आहे.