पुणे: लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अर्थात बाटू विद्यापीठाशी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना संलग्नीकरण घेणे बंधनकारक होते. परंतु, राज्य शासनातर्फे आता या महाविद्यालयांना दुसऱ्या विद्यापीठांशी संलग्नित होण्याची मुभा दिली जाणार आहे. तसेच, बाटू विद्यापीठ हे यापुढील काळात केवळ कॅम्पस युनिव्हर्सिटी म्हणून विकसित केले जाणार आहे, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडले होते. त्यामुळेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांना तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी हे विद्यापीठ केवळ कॅम्पस विद्यापीठ म्हणूनच राहील, त्यात वेगवेगळे अभ्यासक्रम शिकविले जातील. बाटूची विविध ठिकाणी असणारी उपकेंद्र बंद केली जाणार आहेत.
राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात बाटू विद्यापीठाशी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये संलग्नित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील महाविद्यालयांना बाटू विद्यापीठ हे खूप लांब पडत होते.
आपल्या जिल्ह्याजवळील विद्यापीठाशी संलग्नीकरण असल्यास परीक्षा व इतर प्रशासकीय कामकाज करणे महाविद्यालयांना सोयीचे ठरते. त्यामुळे अनेकवेळा व्यावसायिक अभ्यासक्रमांना आपल्या जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नीकरण मिळावे, अशी मागणी केली जात होती. आता लवकरच त्यात सुधारणा केली जाणार असून, त्यासंदर्भातील ऑर्डनन्स काढला जाणार आहे.
पाटील म्हणाले की, परीक्षा व इतर कारणांमुळे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी राजीनामा दिला. परंतु, संलग्नीकरणाबाबतही अनेक महाविद्यालयांना अडचणी येत आहेत. त्यामुळे बाटू विद्यापीठाशी असणारे संलग्नीकरण काढून घेण्याबाबत महाविद्यालयांना मुभा दिली जाणार आहे. पूर्वी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना केवळ बाटू विद्यापीठाशी संलग्नीकरण घ्यावे लागत होते. मात्र, आता ही अट काढून टाकली जाईल. तसेच, या विद्यापीठात विविध व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकविले जातील. त्यामुळे हे विद्यापीठ केवळ कॅम्पस विद्यापीठ म्हणूनच सुरू राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.