Pune Politics: राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यात महायुतीच्या वादळात महाविकास आघाडीची अक्षरश: धूळधाण झाली. काँग्रेसचा तर जिल्ह्यात पूर्णपणे सफाया झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. जिल्ह्यात महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित करीत एकूण 21 पैकी 18 जागी बाजी मारली.
शरद पवार यांचा बालेकिल्ला असणार्या पुणे जिल्ह्यातील त्यांचा पायाच उखडून टाकण्यात त्यांचे पुतणे अजित पवार आणि भाजपला यश आले. शरद पवार यांना अवघी एक जागा मिळाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 8 तर भाजपने 9 जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले. पुणे-पिंपरी या शहरी भागात भाजपने तर ग्रामीण भागात अजित पवार यांनी वर्चस्व मिळवले.
पुण्यातील प्रमुख, उल्लेखनीय विजयामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, चंद्रकांत पाटील, महेश लांडगे, राहुल कुल, दत्तात्रेय भरणे, विजय शिवतारे, सुनील शेळके आदींचा समावेश आहे तर प्रमुख, धक्कादायक पराभवांमध्ये हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, अतुल बेनके, सुनील टिंगरे, अशोक पवार, दिलीप मोहिते, संजय जगताप यांचा उल्लेख करावा लागेल.