पुणे : राज्यात बुधवारी (दि. 9) विदर्भातील अकोला शहरात सर्वाधिक 44.1 अंश तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अमरावती 43, चंद्रपूर 42.6 अंश सेल्सिअस इतका पारा वाढला होता, तर उर्वरित भागातील पारा 40 अंशांपुढे गेला. त्यामुळे बुधवारचा दिवस राज्यासाठी असह्य उष्ण झळांचा ठरला. दरम्यान, गुरुवारपासून (दि. 10) काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे नागरिकांना चांगलाच उष्णतेचा तडाखा बसत आहे. तसेच, रात्रीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे पंखे, कूलर अहोरात्र सुरू झाले आहेत. राज्य उष्णतेच्या लाटेने होरपळत असतानाच पुन्हा वळवाचा पाऊस बरसणार आहे. त्यानुसार विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागांत हा पाऊस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात उष्णतेचा पारा कडक असला तरी सध्या पश्चिम राजस्थानपासून वायव्य विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. याशिवाय मध्य-पूर्व बंगालचा उपसागर ते दक्षिण तामिळनाडू एक द्रोणीय स्थिती, याबरोबरच मध्य प्रदेश (दक्षिणपूर भाग) पासून ते गंगटोक पश्चिम बंगाल पार करून छत्तीसगड, झारखंडपर्यंत आणखी एक द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या स्थितीमुळे राज्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
उष्णतेची लाट आणि दमट हवामान
पालघर, पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, जालना या भागांत गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानात वाढ झालेली आहे. दिवसा कडक उष्णता आणि दमट हवामानामुळे या जिल्ह्यांना अस्वस्थ वातावरणाचा (वेदर डिस्कंफर्ट) इशारा देण्यात आला आहे.
पंजाब, हरियाणा, दिल्ली, सौराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या भागांत पुढील तीन दिवस तीव— उष्णतेची लाट. कमाल तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता.
बुधवारचे कमाल तापमान
मुंबई (कुलाबा)-34.1, सांताक्रुझ- 34.6, अलिबाग-35.6, रत्नागिरी-33, डहाणू-6.2, पुणे- 41.3, लोहगाव-43, जळगाव-43.3, कोल्हापूर- 38.7, महाबळेश्वर - 33.7, मालेगाव- 42.6, नाशिक-41, सांगली -40.3, सातारा - 40.3, सोलापूर- 41.8, धाराशिव - 40.2, छ. संभाजीनगर- 41.6, परभणी-41.3, अकोला -44.1, अमरावती-43, बुलडाणा-42.6, गोंदिया- 39.2, नागपूर -40.8, वाशिम- 42, वर्धा- 40.6, यवतमाळ- 41.2
अकोलाः 44.1 जळगावः 43.3
अमरावतीः 43 चंद्रपूरः 42.6
येथे बरसणार अवकाळी पाऊस
सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,
वाशिम, यवतमाळ.