akashwani pune Pudhari
पुणे

Pune Akashvani FM Broadcast: आकाशवाणी एफएमवर आणण्यास मंजुरी; पण कार्यवाही नाही

मीडियम वेव्हच्या जुन्या तंत्रज्ञानावरच प्रसारण; श्रोत्यांकडून एफएम सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्हाण

पुणे: देशभरात प्रसारण क्षेत्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करीत असताना सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुण्यातील आकाशवाणी केंद्र मात्र अद्याप मध्यम लहरी (मीडियम वेव्ह) या जुन्या तंत्रज्ञानावरच उपलब्ध आहे.

आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रसारण एफएमवर सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव ‌‘प्रसारभारती‌’कडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला सहा महिन्यांपूर्वी मंजुरीही मिळाली आहे. मात्र, अजूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रसारभारतीकडून कोणतीही ठोस पावले टाकली जात नसल्याचे समोर आले आहे.

आकाशवाणीच्या विविध केंद्रांनी गेल्या काही वर्षांत एफएम तंत्रज्ञानाचा स्वीकार केला असून, त्यामुळे श्रोत्यांना अधिक दर्जेदार ध्वनी अनुभव मिळत आहे. मात्र, पुणे केंद्र अजूनही मध्यम लहरींवर सुरू असल्याने अनेक मर्यादा कायम आहेत. विशेषतः शहरी भागातील वाढते इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप, सिग्नलमधील अडथळे आणि तुलनेने कमी ध्वनी गुणवत्ता, यामुळे श्रोत्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एफएम प्रसारणामुळे अधिक स्पष्ट, स्वच्छ आणि दर्जेदार ध्वनी मिळतो. तसेच, मोबाईल, वाहनांमधील रेडिओ संच आणि आधुनिक डिजिटल उपकरणांवर रेडिओ ऐकणे अधिक सुलभ होते. त्यामुळे पुणे केंद्र एफएमवर आणण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती.

या पार्श्वभूमीवर पुणे केंद्राकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आणि त्याला मंजुरीही प्राप्त झाली. मात्र, त्यानंतरच्या प्रशासकीय प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नाही. आकाशवाणी पुणे केंद्रातून प्रसारित होणारे सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, महिला व बालकल्याण तसेच सामाजिक विषयांवरील कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. प्रसारण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून, त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

याबाबत आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल यांनी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने याबाबत पाठपुरावा सुरू आहे, लवकरात लवकर ही सेवा कार्यान्वित होईल, असे वाटते, असे सांगितले.

पुणे केंद्र एफएमवर आल्यास

होणारे फायदे

श्रोत्यांना अधिक स्वच्छ आणि उच्च दर्जाचा ध्वनी अनुभव मिळेल.

मोबाईल, वाहनांमधील रेडिओ आणि आधुनिक उपकरणांवर केंद्र सहज उपलब्ध होईल.

युवा श्रोत्यांपर्यंत आकाशवाणीचे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे पोहचतील.

शहरी भागातील व्यत्यय आणि आवाजाचा त्रास कमी होईल.

शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांवरील कार्यक्रमांची पोहच वाढेल.

डिजिटल युगात सार्वजनिक प्रसारण सेवेला नवे बळ मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT