Pune AI misuse | AI चा असाही वापर, ‘चॅट जीपीटी’वरुनच तयार केला उत्पन्नाचा दाखला : बारामतीतील प्रकाराने खळबळ!  Pune AI misuse
पुणे

Pune AI misuse | AI चा असाही वापर, ‘चॅट जीपीटी’वरुनच तयार केला उत्पन्नाचा दाखला : बारामतीतील प्रकाराने खळबळ!

तहसील कार्यालयाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस, शिधापत्रिकेच्या कामासाठी उपयोग, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बारामती : एका महिलेच्या शिधापत्रिकेसंबंधीच्या कामासाठी चॅट जीपीटीचा आधार घेत उत्पन्नाचा दाखला तयार केल्याप्रकरणी अजिज जाफर सय्यद (रा. बारामती) याच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला. तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेचे अव्वल कारकून सौरभ इंगळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

छाया महादेव सरोदे (रा. तांदूळवाडी, बारामती) या महिलेची शिधापत्रिका खराब झाल्याने दुय्यम पत्रिकेसाठी तसेच मुलाचे नाव पत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी त्यांनी ओळखीच्या अजिज सय्यद याच्याकडे कुटुंबातील सदस्यांची आधार कार्ड, जातीचा दाखला, गॅस कार्ढ, उपलब्ध उत्पन्नाचा दाखला, वीज बिल व मूळ शिधापत्रिका अशी कागदपत्रे दिली होती.

शासनाच्या आरसीएमएस प्रणालीद्वारे ३० जुलै रोजी याबाबतचे प्रकऱण नोंदविले गेले. त्यानंतर दि. ५ ऑगस्ट रोजी पुरवठा शाखेत कागदपत्रे सादर करण्यात आली. यावेळी उत्पनाच्या दाखल्याच्या सत्यतेबाबत संशय निर्माण झाला. त्यामुळे या प्रमाणपत्राची कार्यालयीन अभिलेख, उपलब्ध नोंदी व प्राथमिक पडताळणी करण्यात आली. या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र शासन, तहसील कार्यालय बारामती जिल्हा पुणे असे नमूद करत वार्षिक उत्पन्न ४० हजार रुपये दर्शवले होते. तसेच क्युआर कोड, तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरी वैध असल्याचा आभास निर्माण करणारा मजकूर दिसून आला. तहसीलदारांच्या निर्देशानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात तांदूळवाडी भागातील काही महा ई सेवा केंद्र चालकांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानुसार या वर्षात सरोदे यांच्या नावे उत्पन्नाचा कोणताही दाखला दिला गेला नसल्याचे दिसून आले.

त्यानंतर अजिज सय्यद यांच्याकडे चौकशी केली असता हा दाखला चॅट जीपीटीचा वापर करून तो ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध असल्याचे दर्शविणारा सरोदे यांचा दाखला तयार केल्याचे व तो पुरवठा शाखेत सादर केल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रकरणातील गंभीरता लक्षात आल्यानंतर तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी पुरवठा शाखेला यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा दाखला कसा तयार केला गेला, त्यासाठी कोणता संगणक व प्रणाली वापरली गेली, त्याची मूळ डिजिटल फाईल, संबंधित इलेक्ट्राॅनिक नोंदी, दस्तऐवजात नमूद शासकीय नमुना, जावक क्रमांक, क्यूआर कोड, डिजिटल स्वाक्षरी, शिक्का, आरसीएमएस अर्जासंबंधीचा डिजिटल अभिलेख याची चौकशी आता पोलिसांकडून केली जात आहे. दरम्यान चॅट जीपीटीचा वापर करत उत्पन्नाचा दाखला तयार केल्याच्या प्रकारामुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT