मद्यधुंद मर्सिडीज कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवलं; तरुणाचा मृत्यू Pudhari
पुणे

Pune Vadgaon Accident: पुण्यात कल्याणीनगर अपघाताची पुनरावृत्ती; मद्यधुंद कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवलं; तरुणाचा मृत्यू

Vadgaon Bridge Accident: मद्यधुंद अवस्थेतील चालकाने घेतला तरुणाचा जीव

पुढारी वृत्तसेवा

Pune Vadgaon Bridge Accident

पुणे: पुण्यातील वडगाव ब्रिज परिसरात आज (शनिवार, ३ मे) पहाटे चार वाजता भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका मर्सिडीज कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. कुणाल हुशार असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारचा वेग जास्त होता, त्यामुळे धडक लागल्यानंतर कार वडगाव पुलावरील बॅरिकेड तोडून खाली सर्व्हिस रोडवर पडली. या अपघातबाबात पुणे शहर डीसीपी पोलिस संभाजी कदम यांनी सांगितले की, आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच दोन आरोपी अटकेत असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात तपास सुरू करण्यात आला आहे. (Latest Pune News)

दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघात झाल्यानंतरही कारमधील चार जण रस्त्यावर उतरून गोंधळ घालत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चालक आणि सहकाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (A) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणीनगर अपघाताची पुनरावृत्ती

गेल्या वर्षी मे महिन्यात पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन कारचालकाने दुचाकीला उडवल्याची घटना घडली होती. यात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुण्यात संतापाची लाट उसळली होती. कारचालक हा अल्पवयीन होता आणि अपघातापूर्वी तो एका नामांकित पबमध्ये मद्यपान करताना दिसला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असले तरी त्याच्या सुटकेसाठी एक आमदार चक्क पोलीस ठाण्यात गेल्याचे समोर आले होते.

घटनेनंतर पुण्यातील नागरिक रस्त्यावर उतरले होते. देशभरात या घटनेवरून संताप व्यक्त होता. शेवटी पुणे पोलिसांनी मद्यपी कारचालकांवर लगाम लावण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासनही दिले. मात्र, वर्षभरानंतर पुन्हा अशाच स्वरुपाची घटना घडली आहे. त्यामुळे पुणे पोलीस खरंच कठोर पावले उचलणार का, कारवाईत सातत्य राहणार का असा सवाल नागरिक विचारत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT