शेळगाव : इंदापूर-बारामती श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील चौपन्न फाटा (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि. १२) दुपारी चारचाकी व मोटार सायकलचा झालेल्या अपघातात मोटर सायकलस्वार ७७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी बारामती येथे रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर-बारामती संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील चौपन्न फाटा पेट्रोलपंपानजीक रविवारी दुपारी दोन वाजण्यास सुमारास बारामतीकडून आलेल्या चारचाकी गाडीचा व मोटरसायकलचा अपघात झाला. यामध्ये घोरपडवाडी (ता. इंदापूर) येथील तानाजी पांडुरंग झेलमर (माळी) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी कमल तानाजी झेलमर (माळी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी बारामती येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.