Pune Dahi Handi Accident Pudhari
पुणे

Pune Accident: क्षणात होत्याचं नव्हतं! दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यावर पडला, महिलेचा दुर्दैवी मृत्यू, मुलगा मंडळाचा कार्यकर्ता

Pune Dahi Handi Accident: पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडीचा लोखंडी सांगाडा उतरवताना भीषण अपघात झाला.

Rahul Shelke

Pune Dahi Handi Accident: दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा उतरवण्याचे काम सुरू असतानाच जुन्या सांगवी परिसरात दुर्दैवी अपघात घडला. लोखंडी स्ट्रक्चरचा अवजड भाग थेट डोक्यावर कोसळल्याने सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उत्सवासाठी उभारण्यात आलेले लोखंडी स्ट्रक्चर काढण्याचे काम सुरू होते. याचवेळी स्ट्रक्चरचा एक भाग अचानक खाली आला आणि त्याखाली असलेल्या सलमा पठाण यांच्या डोक्याला जोरदार धडकला.

अचानक घडलेल्या या दुर्घटनेत सलमा गंभीर जखमी झाल्या. मात्र, त्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची आणखी एक वेदनादायी बाजू म्हणजे सलमा पठाण यांचा मुलगा याच दहीहंडी मंडळाशी संबंधित असून तो मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पठाण कुटुंबावर या घटनेचा मोठा आघात झाला आहे.

दरम्यान, मुलाचा मंडळातील सहभाग लक्षात घेता पठाण कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. मात्र, घटना गंभीर असल्याने पोलिसांनी प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन आवश्यक कारवाई केली आहे.

दहीहंडीचा उत्सव आनंदात पार पडल्यानंतर काही तासांतच घडलेल्या या दुर्घटनेने जुन्या सांगवी परिसरातील उत्सवाच्या वातावरणावर दुःखाची छाया पसरली आहे. उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मोठ्या लोखंडी संरचनांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT