शिरवळ : मावळ (जि. पुणे) येथून महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी जात असलेल्या चार जिवलग मित्रांचा सातारा- पुणे महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा) येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. भरधाव कार महामार्गाच्या लेनवरून दुभाजकाला धडकून दुसऱ्या लेनवर गेली. तेथे उलटून कार ट्रकला धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अन्य दोन मित्र गंभीर जखमी आहेत. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुसऱ्या कारमधून निघालेल्या मित्रांसोबत लावलेली शर्यत जीवाशी बेतल्याची चर्चा आहे.
वेदांत अर्जुन वारिंगे (१९, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, रा. टाकवे, ता. मावळ), सोनसिंग धीरेंद्र ठाकूर (१९) आणि निखिल बाळू राऊत (२०, दोघे रा. कामशेत, ता. मावळ) अशी मृत तरुणांची नावे आहेत. चालक मयूर हनुमंत शिंदे (२०) आणि दीक्षित दयानंद पुजारी (२०) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविले.
मुळशी तालुक्यातील हे तरुण दोन कारमधून फिरण्यासाठी साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. या कारमध्ये कोण वेगाने पुढे जाणार, यावरून रेस लागल्याची चर्चा आहे. त्यापैकी एक कार (एमएच १२ एलजे ३०३३) शिरवळ हद्दीत आली असता भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार डिव्हायडरला धडकून तीन ते चार पलट्या खात विरुद्ध दिशेच्या सातारा-पुणे लेनमध्ये जाऊन पडली. याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.
अपघातावेळी कारमधील चालक मयूर शिंदे आणि त्याच्या शेजारी बसलेल्या दीक्षित पुजारी यांच्या एअरबॅग उघडल्या. त्यामुळे भीषण धडकेतही दोघांचे प्राण वाचले. मात्र, कारच्या मागील बाजूस बसलेल्या चार तरुणांना जीव गमवावा लागला. अपघातानंतर मागील आलेल्या कारने स्थानिकांची मदत घेतली. तसेच कुटुंबीयांना माहिती दिली.
अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलिस, स्थानिक युवक आणि शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचे दरवाजे जाम झाल्याने दरवाजे कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे बचावकार्य पूर्ण करण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागला. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी ट्रकचालक शिवकुमार देवांगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक मयूर शिंदे याच्यावर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार तीन ते चार पलट्या खात विरूद्ध दिशेच्या आयशर ट्रकवर आदळली. त्यामुळे कारचे सर्व दरवाजे जाम झाले होते. ते काही केल्या उघडत नव्हते. त्यामुळे मृतदेह बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक ठरले. शिरवळ रेस्क्यू टीम, स्थानिक युवक आणि पोलिसांनी हे जाम झालेले दरवाजे अक्षरश: कापून मृतदेह बाहेर काढले. यानंतर सर्व मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.