Accident file photo
पुणे

Pune Accident | पीएमपी बसमधून पडली, थेट बाजूने जाणाऱ्या स्कूल बसखाली सापडली : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू!

सिंहगड रस्त्यावरील दुर्घटना, डाएटमध्ये एम. टेक.च्या दुसऱ्या वर्षात घेत होती शिक्षण

पुढारी वृत्तसेवा

पुणे : संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी) येथे एम. टेक.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय विद्यार्थिनीचा पीएमपी बसमधून पडून दुसऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझा दुकानासमोर घडली. कांचन बळवंत खड्डा (वय २५) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी बसचालक आणि स्कूल बसचालकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही चालकांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन खड्डा ही मूळची राजस्थानमधील हनुमानगड येथील होती. तिने भारतीय तंत्रज्ञान संस्था, बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ती खडकवासला येथील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी) येथे एम. टेक.च्या दुसऱ्या वर्षात सेमीकंडक्टर चिप डिझाइन विषयात शिक्षण घेत होती.

या विषयात पीएच. डी. करण्याचे तिचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिने तयारीही सुरू केली होती. कांचन ही डीआयएटीच्या परिसरातील कृष्णा होस्टेलमध्ये राहत होती. सोमवारी दिघी येथील डीआरडी लॅबमध्ये प्रात्यक्षिक असल्याने ती खडकवासला येथून पीएमपी बसने जात होती. सकाळी सुमारे पावणेदहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझा दुकानासमोर ती बसच्या पुढील दरवाजातून खाली पडली.

त्याच वेळी बाजूने जाणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली ती आल्याने गंभीर जखमी झाली. जखमी कांचनला तत्काळ जगताप रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT