टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील माळीवस्ती परिसरातील ओढ्यात पाय घसरून पाण्यात पडल्याने राजेंद्र विक्रम कोळी हा (वय २५) तरुण पाण्यात वाहून गेला आहे.
रविवारी (दि. २४) सकाळी १० वाजता राजेंद्र ओढ्याकडे आला असताना अरुंद ओढ्यातील खडकावरून दुसऱ्या बाजूला उडी मारत असताना त्याचा पाय घसरला. जिथे तो पडला त्या ठिकाणी खडक असून, तेथे खडकामध्ये रांजणाच्या आकाराचा मोठा खड्डा आहे. त्यामुळे तो खड्ड्यात अडकला की प्रवाहात वाहून गेला याचा अंदाज येत नसल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत.
टाकळी हाजी दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी सहकाऱ्यांसह शोध मोहीम राबविली. मात्र, शोधकार्यात अडचणी आल्याने विशेष पथकास पाचारण करण्यात आले आहे.