पुणे: दिवाळीच्या मंगलमय वातावरणात भक्तिगीते, अभंग, नाट्यपदे, भावगीते आणि लावणीच्या सुरांनी सजलेली मैफल... संगीतरसिकांची लाडकी युवा गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुरेल स्वरांची गुंफण, एकमेकांच्या गायनाला दोघांनीही केलेली सुरेल स्वरसाथ आणि प्रत्येक सादरीकरणानंतर रसिकांकडून मिळणारी टाळ्यांची उत्स्फूर्त दाद, अशा संगीतमय वातावरणात बुधवारी (दि. ११) ‘पुढारी सूर दीपावली’ची मैफल रंगली.
भाऊबीजच्या प्रसन्न पहाटे बालगंधर्व रंगमंदिरात रसिकांनी मोठी गर्दी केली अन् मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या लोकप्रिय जोडीने आपल्या सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली. भक्तिरचनांपासून नाट्यगीतांपर्यंत अन् भावगीतांपासून लावणीपर्यंत विविध संगीतप्रकारांचा आविष्कार घडवत या जोडीने मैफलीत रंगत आणली. दिवाळीच्या आनंदोत्सवात सुरेल संगीत सोहळ्याची ही पर्वणी रसिकांसाठी खास ठरली.
‘सुरांच्या प्रकाशात उजळणारी एक रम्य पहाट’ ही संकल्पना घेऊन ‘पुढारी माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी सूर दीपावली’ या स्वरांच्या मैफलीने सणाच्या आनंदात आणखी भर घालत रसिकांची भाऊिबजेची पहाट आनंदमयी केली. मैफलीत मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या गायकीने रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाला विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. संदेश पवळे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे (मल्टिस्टेट) सहायक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा. फुलचंद चाटे, ढोणे सुझुकी ग्रुपचे शाखा प्रमुख सुहास गायकवाड, दैनिक ‘पुढारी’च्या पुणे आवृत्तीचे सहायक सरव्यवस्थापक विजय शिरगावकर, पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी, जाहिरात विभागप्रमुख संतोष धुमाळ, संतोष गोगावले, एचआर विभागप्रमुख आनंद कुलकर्णी आणि वरिष्ठ लेखा अधिकारी अतुल येवले आदी उपस्थित होते.
मुख्य प्रायोजक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (मल्टिस्टेट), सहप्रायोजक अमर बिल्डर्स अँड प्रमोटर्स, कोहिनूर ग्रुप, चाटे ग्रुप, रविराज रिअल्टी, ऑटोमोबाईल पार्टनर ढोणे सुझुकी यांच्या विशेष सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
सुनील माळी यांनी प्रास्ताविक केले. योगिता गवस यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद कुलकर्णी यांनी ओघवत्या, अभ्यासपूर्ण आणि प्रसंगी विनोदी शैलीतील निवेदनातून मैफलीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवले. श्री गणरायाला वंदन करून मैफलीची सुरुवात करण्यात आली.
कौस्तुभ आठल्ये यांनी लिहिलेली आणि प्रथमेश यांनी संगीतबद्ध केलेले ‘प्रभो विघ्नहर्ता, गणेशा अनंता’ हे भक्तिगीत मुग्धा आणि प्रथमेश यांनी एकत्रित सादर केले. दोघांच्या आवाजातील सुरेल ताळमेळाने मैफलीची दमदार सुरुवात झाली. यानंतर सुरुवातीला प्रथमेश यांनी देव दीनाघरी धावला या संगीत नाटकातील ‘मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाळा’ ही भूपाळी सादर करीत रसिकांची मने जिंकली. मुग्धा यांनी त्यांना दिलेली सुरेल साथ या सादरीकरणाला अधिक खुलवून गेली.
बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली आणि पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेली ही रचना प्रथमेश यांनी सादर करताच रसिकांनी त्यांचा गायकीला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली, तर या वेळी मिलिंद कुलकर्णी यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे विविध पैलू उलगडले. कवी प्रवीण दवणे यांनी लिहिलेली आणि श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ‘तेजोमय नादब्रह्म हे’ ही रचना मुग्धा आणि प्रथमेश यांनी सादर केली. दोघांच्या आवाजातील एकरूपता आणि सुरांची सुंदर गुंफण रसिकांना भावली. कलाकारांना तबल्यावर रूपक वझे, पखवाजावर मिलिंद लिंगायत, संवादिनीवर हर्षद काटदरे, ऑक्टोपॅडवर प्रणव काताळे, की - बोर्डवर तुषार दीक्षित यांनी समर्पक साथसंगत केली. सतीश कांबळे यांनी ध्वनी संयोजन केले.
यानंतर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा समृद्ध वारसा आणि मराठी भाषेचे सांस्कृतिक वैभव याविषयी कुलकर्णी यांनी विवेचन केले. संतांच्या रचना काळाच्या ओघातही अक्षय राहिल्या आणि म्हणूनच त्या अभंग ठरल्या, असे सांगत त्यांनी संत चोखामेळा यांचा जीवनप्रसंग उलगडला. संत चोखामेळा यांनी रचलेला पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेला ‘सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी’ हा अभंग मुग्धा यांनी सादर केला. रागांचा सुरेख वापर करीत त्यांनी या रचनेतील सौंदर्य खुलवले.
अभिषेकी बुवांच्या संगीताचा अभ्यास आणि वेगवेगळ्या रागांचा केलेला प्रयोग याविषयीही मुग्धा यांनी मनोगत व्यक्त केले. या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. यानंतर ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले, पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेले आणि पंडित भीमसेन जोशी यांनी मूळ गायलेले ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ ही भक्तिरचना प्रथमेश यांनी सादर केली. या रचनेच्या निर्मितीमागील एक रंजक आठवण कुलकर्णी यांनी सांगितली. प्रथमेश यांनी या गीतातील भक्तिभाव आणि सुरेलता प्रभावीपणे सादर केली. रसिकांच्या आग्रहास्तव प्रथमेश यांनी ही रचना पुन्हा एकदा सादर केली.
मुग्धा यांनी श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले संगीत पाणिग्रहण नाटकातील ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे नाट्यपद सादर केले. या सादरीकरणाला रसिकांकडून वन्समोअर मिळाला. प्रथमेश यांनी संगीत मंदारमाला या नाटकातील ‘जय शंकरा गंगाधरा’ या नाट्यपदातून भगवान शंकर यांच्या स्तुतीचा भावपूर्ण आविष्कार केला. त्यानंतर जगदीश खेबुडकर लिखित, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले, आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेले धाकटी बहीण चित्रपटातील ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले मुक्या भावनांना’ हे लोकप्रिय युगुलगीत मुग्धा आणि प्रथमेश यांनी सादर करीत दाद मिळवली. प्रेमभावना, राधा-कृष्णाचे नाते आणि समर्पण यांचा संदर्भ देत कुलकर्णी यांनी निवेदनातून प्रेमाचा वेगळा अर्थ उलगडला.
त्यानंतर ‘मी राधिका, मी प्रेमिका’ ही रचना मुग्धा यांनी सादर करताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रेमभावनेला पुढे नेत प्रथमेश यांनी ग. दि. माडगूळकर लिखित, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले आणि पंडित रामदास कामत यांनी गायलेले ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील ‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला’ हे गीत सादर केले. मुग्धा यांनी श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली आणि राजा बढे यांनी लिहिलेली ‘कळीदार कपुरी पान’ ही प्रसिद्ध लावणी सादर केली. लावणीच्या सुरुवातीला मिलिंद लिंगायत यांनी केलेल्या ढोलकीच्या एकल वादनाने रसिकांची मने जिंकली.
ढोलकीच्या ठेक्यावर मुग्धा यांनी लावणीतील नजाकत आणि ठसका आपल्या गायनातून साकारला. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. काही रसिकांनी ढोलकीच्या तालावर ठेकाही धरला. त्यानंतर प्रथमेश यांनी ‘दत्त दर्शनीला जायाचं नी जायाचं’ ही भक्तिरचना सादर केली. संत तुकाराम महाराज यांचा ‘श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा’ हा अभंग मुग्धा यांनी भावपूर्ण स्वरांत सादर केला. तुकोबांच्या काव्यातील सामाजिक जाणिवा, श्री विठ्ठलाशी संवाद साधण्याचे त्यांचे सामर्थ्य आणि समाजातील दुःखितांविषयी असलेली संवेदनशीलता यांचे महत्त्व कुलकर्णी यांनी निवेदनातून स्पष्ट केले. संत तुकाराम महाराज हे कालातीत समकालीन कवी असल्याचे सांगताना त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील प्रसंगही उलगडले.
प्रथमेश यांनी सादर केली तीन रचनांची शृंखला
प्रथमेश यांनी तीन रचनांची सुरेल शृंखला सादर केली. ‘आजी आनंद आनंद, मनी भरला पूर्णानंद’, ‘हृदयाच्या तालावर नाचे गणेशु’ आणि ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या रचनांतून त्यांनी भक्तिसंगीताचे विविध रंग उलगडले या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
देशस्थ-कोकणस्थांचा मिश्किल किस्सा
‘तिच्या डोळ्यांत होकार आणि ओठात नकार’ या ओळीच्या निमित्ताने मिलिंद कुलकर्णी यांनी देशस्थ, कोकणस्थ आणि कऱ्हाडे ब्राह्मण यांच्यातील गमतीदार किस्से सांगितले. गेलेली वीज पुन्हा आल्यानंतर देशस्थांच्या घरातून ‘लाईट आले, लाईट आले’ असा आवाज येतो; तर कोकणस्थांच्या घरातून मेणबत्त्या फुंकल्याचा आवाज येतो, अशी टिप्पणी त्यांनी केली. तर, गेलेली वीज पुन्हा आल्यानंतर सुद्धा कऱ्हाडेंच्या घरात मेणबत्ती शोधण्याचा कार्यक्रम सुरू असतो, यावर विशेष दाद दिली ती मुग्धा यांनी. ती पाहून कुलकर्णी म्हणाले, प्रथमेश कऱ्हाडे असल्यामुळे लघाटे घराण्याच्या या कोकणस्थ सुनेने या विनोदाला विशेष दाद दिली आहे, हे ऐकताच सभागृहात एकच हशा पिकला. पुणेरी विनोदाची ही फोडणी मैफलीत रंगत आणणारी ठरली.
श्री विठ्ठलाच्या गजरात रसिक झाले दंग
मैफलीच्या सांगतेसाठी मुग्धा आणि प्रथमेश यांनी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि पं. वसंतराव देशपांडे, सुधीर फडके यांनी मूळ गायलेले ‘कानडा राजा पंढरीचा’ हे लोकप्रिय भक्तिगीत एकत्रित सादर केले. दोघांच्या सुरेल आवाजातील या गीताने सभागृहात भक्तिरसाचे वातावरण निर्माण झाले. कलाकारांसह रसिकांनीही या वेळी श्रीविठ्ठलनामाचा गजर केला. श्रीविठ्ठल, श्रीविठ्ठलच्या जयघोषाने सभागृह दुमदुमून गेले. या वेळी कलाकारांना मिळालेली वादकांची समर्पक साथ आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद, यामुळे मैफलीचा शेवटही तितकाच दमदार झाला. रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली. कार्यक्रमाच्या अखेरीस मिलिंद कुलकर्णी यांनी कलाकारांच्या कलेला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचे काम रसिक करतात, असे सांगताना त्यांनी रसिकांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा प्रकारे संगीताचे विविध रंग, अभ्यासपूर्ण निवेदन, कलाकारांचा सुरेल ताळमेळ आणि रसिकांच्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादातून ‘पुढारी सूर दीपावली’ची मैफल संस्मरणीय ठरली.
आलो इंदापूरला थेट, घेतली प्रतिभाताईंची भेट!’
श्री दत्तगुरूंची स्तुती करणारी ‘दत्त दर्शनीला जायाचं नी जायाचं’ ही भक्तिरचना प्रथमेश लघाटे यांनी सादर केली. या रचनेशी जोडलेला एक मजेशीर किस्सा मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या. त्या वेळी प्रथमेश हे लहान होते. कार्यक्रमात शेवटचे कडवे गाण्याची त्यांना इच्छा झाली. त्यांनी वडिलांकडे हट्ट धरला. मात्र, कोणते कडवे गायचे, याची त्यांना पूर्ण कल्पना नव्हती. त्यांनी निरागसपणे ‘आलो इंदापूरला थेट, घेतली प्रतिभाताईंची भेट’ असे कडवे गाण्याचा हट्ट केला होता, अशी आठवणही कुलकर्णी यांनी सांगितली. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील रसिकांशी नाते जोडताना ‘आलो पुण्याला थेट, घेतली रसिकांची भेट’ या ओळींनीही मैफलीत रंगत आणली.
वसंतरावांनी निभावली मैत्री
‘इंद्रायणीकाठी देवाची आळंदी’ या गीताच्या ध्वनिमुद्रणावेळी ऑर्गनवादक आले नसल्याने रेकॉर्डिंग थांबले होते. त्याच वेळी तेथे आलेल्या वसंतराव देशपांडे यांनी परिस्थिती समजून घेत स्वतः ऑर्गन वाजवण्याची तयारी दर्शवली. पंडित भीमसेन जोशी आणि पु. ल. देशपांडे यांच्याशी असलेली मैत्री जपत त्यांनी ऐनवेळी साथ दिली, हा प्रसंग सांगत मिलिंद कुलकर्णी यांनी पं. वसंतराव देशपांडे यांनी मैत्रीचे बंध निभावले, असे सांगितले.
शास्त्रीय संगीताचे वेगवेगळे राग समजून घेत त्यातील सौंदर्य शोधण्याचा माझा प्रयत्न असतो. एखादी रचना सादर करताना तिचे मूळ स्वरूप जपतानाच त्यातील वेगळे पैलू उलगडण्याचा आनंद मिळतो. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या गुरुस्थानी असलेल्या संगीतकारांची रचना सादर करणे ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. रसिकांकडून मिळणारी दाद आणि प्रेम यामुळे गाण्याचा उत्साह अधिक वाढतो.मुग्धा वैशंपायन, प्रसिद्ध गायिका
मराठी संगीताला संतपरंपरेपासून नाट्यसंगीत, भावगीत आणि शास्त्रीय संगीतापर्यंत समृद्ध वारसा लाभला आहे. या परंपरेतील वेगवेगळ्या रचना सादर करताना त्या गाण्यांमागील संगीतकार, गीतकार आणि गायकांचे योगदान नव्याने अनुभवता येते. प्रत्येक रचनेतून काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न असतो. पुण्यासारख्या संगीतप्रेमी रसिकांच्या शहरात गाणे सादर करणे आणि त्यांच्याकडून भरभरून दाद मिळणे, हा अविस्मरणीय अनुभव आहे.प्रथमेश लघाटे, प्रसिद्ध गायक