पुणे; पुढारी वृत्तसेवा : पु. ल. देशपांडे उद्यानाच्या प्रवेशद्वारावर विक्रेत्यांकडून होणारे अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. तेवढ्यापुरतीच कारवाई केली जाते. कारवाईनंतर लगेच दुसर्या दिवशी तेच विक्रेते पुन्हा अतिक्रमण करतात. त्यामुळे किती वेळा तक्रारी करायच्या? आता आम्हाला प्रवेशद्वाराच्या बाहेर काय होते, याच्याशी काहीही देणं घेणं नाही, असे म्हणत उद्यान अधिकार्यांनी अतिक्रमण विभागासमोर हात टेकले आहेत.
महापालिकेने सिंहगड रस्त्याच्या परिसरात पु. ल. देशपांडे उद्यान साकारले आहे. या ठिकाणी नागरिक आपल्या मुलांना घेऊन येतात. मात्र, या उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच भेळ, पाणीपुरी आणि विविध वस्तू विकणार्यांचे स्टॉल लावले जातात. त्यामुळे उद्यानात ये-जा करणार्या वाहनांना आणि नागरिकांना अडथळा निर्माण होतो. प्रवेशद्वारासह नवीन पदपथावरही अतिक्रमण केले जाते.
या अतिक्रमणासंदर्भात अतिक्रमण विभागाकडे उद्यान प्रशासनाने वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अतिक्रमण विभागाकडून या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. कारवाई करून उचलून नेलेला खाद्यपदार्थांचा स्टॉल दुसर्या दिवसी पुन्हा त्याच जागेवर थाटला जातो. त्यामुळे उद्यान प्रशासनाने आता या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
अतिक्रमण विभागाला कळवल्यावर ते दुर्लक्ष करतात, विक्रेत्यांना बोलल्यावर अंगावर धावून येतात. त्यामुळे गेटच्या बाहेर काय होते, याच्याशी आम्हाला काहीही देणे-घेणे नाही, असे म्हणत उद्यान अधिकार्यांनी व सुरक्षारक्षकांनी अतिक्रमण विभागाच्या कामकाजापुढे हात टेकले आहेत.
दुसरीकडे संपूर्ण सिंहगड रस्त्यावर पदपथ सोडून दररोज विविध विक्रेते मुख्य रस्त्यावरच वेगवेगळ्या वस्तू, फळभाज्या विक्री करतात. या ठिकाणी वाहनचालक रस्त्यालाच वाहने उभी करून खरेदी करतात, त्यामुळे सायंकाळी या ररस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, अतिक्रमण विभागाचे अधिकारी विक्रेत्यांकडून हप्ते घेतात, त्यामुळे कारवाई केली जात नाही, असा आरोप परिसरातील काही नागरिकांनी केला आहे.