पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या आशीर्वादानेच पदपथावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू असल्याचे शनिवारी पु. ल. देशपांडे उद्यानाच्या बाहेर पाहायला मिळाले.
पु. ल. देशपांडे उद्यानाच्या प्रवेशद्वारावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून अतिक्रमण करून स्टॉल थाटले जातात.
यामध्ये उद्यानात ये-जा करणार्या नागरिकांना आणि दुचाकी चारचाकी वाहनांना अडथळा निर्माण होतो. या संदर्भात उद्यान विभागाच्या अधिकार्यांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात. मात्र, दुर्लक्ष केले जाते. कारवाई केलीच, तर दुसर्या दिवशी स्टॉल पुन्हा दिसतात. विक्रेते व अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्या युतीपुढे अद्यान विभागाच्या अधिकार्यांनी आणि उद्यानाच्या सुरक्षा रक्षकांनी हात टेकल्याचे वृत्त मपुढारीफने शनिवारी प्रसिद्ध केले.
या वृत्ताची दखल घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी उद्यानाजवळ येऊन थांबली. मात्र, या वेळी अतिक्रमण विभागाने कोणतीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतली. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ अतिक्रमण विभागाची गाडी थांबल्यानंतर स्टॉलधारकांनी उद्यानाचे प्रवेशद्वार मोकळे ठेवले. मात्र, अतिक्रमण विभागाच्या साक्षीनेच येथील सुशोभित पदपथावर आपले व्यवसाय थाटले होते.