पुणे: वाढती बेरोजगारी आणि ड्रग्ज तस्करी विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले होते. ‘नोकरी द्या, नशा नको’ अशा घोषणा देत कार्यकर्ते काँग्रेस भवन येथून डेक्कनकडे निघाले. मात्र, बालगंधर्व रंगमंदिरासमोरील झाशीची राणी चौक येथे पोलिसांनी आंदोलकांना अडविले. या वेळी आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.
बॅरीकेटिंगवरून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार्या युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांना पकडून पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब, महाराष्ट्र युवक अध्यक्ष कुणाल राऊत, प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी एहसान खान, कार्याध्यक्ष शिवराज मोरे, शहराध्यक्ष सौरभ आमराळे, कुमार रोहित यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनापूर्वी काँग्रेस भवन येथे सभा झाली. या वेळी प्रमुख पदाधिकार्यांनी आंदोलनामागील भूमिका सांगितली. या वेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अॅड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.
या वेळी उदय भानू चिब म्हणाले, मागच्या दहा वर्षांत देशात कधी नव्हती तेवढी बेरोजगारी आणि ड्रग्सचे प्रमाण वाढले आहे. देशात सध्या बेरोजगारी आणि नशेखोरी या दोन समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. गुजरातमधील अदाणी यांच्या मुंद्रा पोर्टमध्ये हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स पकडले गेले. त्याचे पुढे काय झाले ? असा सवाल करीत देशात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे मित्र अदानी यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ड्रग्जमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असून, या विरोधात युवक काँग्रेसने देशभरात ‘नोकरी द्या, नशा नाही,’ ही मोहीम सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. याचसाठी आज पुण्यात आम्ही जमलो आहोत. पिंपरी-चिंचवडमध्ये घरे पाडून लोकांना बेरोजगार केले जात आहे. या विरोधात आम्ही आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुणाल राऊत म्हणाले, आम्ही निवडणुकीत हरलो नाहीत. आम्हाला हरविण्यात आले आहे. बोगस मतदान करून राज्यात काँग्रेसला हरविण्यात आले आणि हे सरकार सत्तेत आले आहे. आज राज्यात खून, किडनॅपिंगसारखे प्रकार वाढले असून, राज्याला बिहारच्या दिशेने घेऊन चालल्याची टिका त्यांनी केली. या वेळी कार्याध्यक्ष शिवराज मोरे, शहराध्यक्ष सौरभ आमराळे यांचेही भाषण झाले.
आंदोलनकर्त्यांची धरपकड
काँग्रेस भवन येथून युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते घोषणाबाजी करीत डेक्कनच्या दिशेने निघाले होते. आंदोलनकर्ते बालगंधर्व रंगमंदिर समोरील झाशीची राणी चौक येथे आल्यानंतर पोलिसांनी बॅरीकेटिंग करीत त्यांना अडविले. पुढे जाऊ न दिल्याने आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले.
आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. पोलिसांच्या आदेशाला झुगारून पुढे जाण्याच्या प्रयत्न करणार्या काही आंदोलकांना पोलिसांनी पकडून व्हॅनमध्ये बसविले. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.