पुणे: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असे वक्तव्य करणार्या शिंदे गटाच्या नेत्या तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिले.
दिल्लीतील 98व्या अखिल साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिंदे गटाच्या नेत्या तसेच नीलम गोर्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असे वक्तव्य केले होते. याविरोधात ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने नीलम गोर्हे यांच्या मॉडल कॉलनीसमोर आंदोलन करण्यात आले.
या वेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी केली. पक्षाने चार वेळा आमदारकी दिली, उपसभापतिपद दिले आहे. गोर्हे यांनी पाच मर्सिडीज दिल्या असतील, त्याची पावती दाखवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी या वेळी केली.
नीलम गोर्हे माफी मागावी तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. गोर्हे यांची इनोवा ठाकरे गटाच्या नेत्याकडून घेतली आहे. दोन वर्षांनंतर त्या गाडीचे टायर सुद्धा ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांकडून घेतले असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिले.
या आंदोलनात ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या रेखा कोंडे, रोहिणी कोल्हाळ, करुणा घाडगे, सोनाली जुनावणे, पद्मा सोरटे, निकिता मराटकर, मंगल वाघमारे, गायत्री गरुड, विजया मोहिते, निर्मला वाघमारे, मीना वाघमारे, सीमा जगताप, रेखा कोळेकर, स्नेहल पाटोळे, युवासेनेचे युवराज पारिख, गिरीश गायकवाड, रमेश परदेशी आदी उपस्थित होते.