Pune News: काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गोखले रस्त्यावरील गुडलक चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, सदानंद शेट्टी, मेहबुब नदाफ, अजित दरेकर, नीता रजपूत, लता राजगुरू, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, रमेश सोनकांबळे, विनोद रनपिसे, अविनाश अडसुळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहराध्यक्ष शिंदे म्हणाले, भाजपचे नेहमीचे धोरण आहे की, ‘खोटे बोला पण रेटून बोला’. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमित शहांनी केलेल्या वक्तव्याविरोधात संसदेत आवाज उचलला आणि देशाच्या जनतेसमोर भाजपाचा पर्दाफाश केला. यामुळे त्यांनी पोलिसांवर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल केले.