प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : भारतात दोन दशकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. कोरोना साथीनंतर हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या 'अॅडव्हर्स इफेक्ट सिरो सर्व्हेलन्स ऑफ इंडिया' अंतर्गत अभ्यास सुरू आहे. कोरोनाचा तीव्र संसर्ग होऊन गेलेल्या रुग्णांनी हृदयाला जपा, असा सल्ला हृदयरोग तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनाचा तीव्र संसर्ग झालेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका उदभवू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून विषाणूने फुप्फुसांप्रमाणेच हृदयावरही हल्ला केला, असे निरीक्षण समोर आले आहे. स्टेरॉईडस, रेमडिसिव्हिर यांचा वापर झालेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे कोरोनापश्चात विकारांमध्ये हृदयविकाराचा प्राधान्याने समावेश झाला.
आज जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदा 'सर्वांसाठी आरोग्य' ही थीम जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनानंतर हृदयरुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर दै.'पुढारी'ने हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्याशी चर्चा केली.
ते म्हणाले, 'कोरोना काळात लसीमुळे अनेकांचे प्राण वाचले, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले, संसर्गाची तीव्र ता कमी झाली. कोणतीही नवी लस विकसित झाली की त्याला विरोध करणारा एक वर्ग कायमच पाहायला मिळतो. जगात किती कोटी लोकांनी लस घेतली आणि किती जणांमध्ये हृदयविकार दिसून आला, याची आकडेमोड केली तरी परिस्थिती लक्षात येऊ शकेल. त्यामुळे लसीकरणामुळे हृदयविकारांचे प्रमाण वाढले, यास निश्चित शास्त्रीय आधार नाही.'
ससूनमध्ये पाच
वर्षांत झालेल्या अँजिओप्लास्टी
2017 : 356
2018 : 398
2019 : 492
2020 : 320
2021 : 459
2022 : 470
आहारात स्निग्ध पदार्थांचे वाढलेले प्रमाण, तंतुमय पदार्थांची कमतरता यामुळे शरीराचा समतोल बिघडत आहे. धूम्रपान, मद्यपान, तंबाखूचे सेवन या सवयी घातक ठरत आहेत. त्यामुळे हृदयरोगासह मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजारांचा विळखाही बसला आहे. त्यामुळे केवळ कोरोनानंतर हृदयविकाराचे प्रमाण वाढले, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्र, हृदयरोगाशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे, वेळच्या वेळी तपासण्या करून घेणे आणि जीवनशैलीतील बदल करणे प्राधान्याने करायला हवे.
– डॉ. अभिजित वैद्य, हृदयरोग तज्ज्ञ
कोरोना आणि हृदयविकारांमधील वाढ यांच्यातील संबंध समजून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, कोविड 19 संसर्ग आणि त्याची तीव—ता यांचा रुग्णाच्या सध्याच्या वैद्यकीय समस्येशी काही संबंध आहे का, हे समजून घेण्यासाठी सध्या दाखल असलेल्या गंभीर रुग्णांचा अभ्यास सुरू आहे.
– डॉ. हेमंत कोकणे, हृदयविकार तज्ज्ञ