पुणे

महामार्गावर वेश्या व्यवसाय सुसाट

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहर परिसरात सुरू असलेला वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. चालू वर्षात वेश्या व्यवसायप्रकरणी 139 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, 122 महिलांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर काही ठिकाणी वेश्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथून जाताना महिलांची कुचंबणा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

चालू वर्षात 58 ठिकाणी छापा

पोलिस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने चालू वर्षात 58 ठिकाणी छापे मारून 122 महिलांची सुटका केली आहे. याव्यतिरिक्त स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या मोठ्या रॅकेटलादेखील या विभागाने सुरुंग लावला आहे. मात्र, अलीकडे वेश्या व्यवसायातील मोठ्या रॅकेटपेक्षा रस्त्यावर उभे राहून शुकशुक करणार्‍या महिलांनी शहराच्या अब—ुची लक्तरे वेशीवर टांगल्याचे पाहावयास मिळत आहे.

संबंधितांवर कारवाई मागणी

यामध्ये प्रामुख्याने पुणे-मुंबई महामार्गावरील नाशिक फाटा, कासारवाडी, बोपोडी, भक्ती- शक्ती चौक, सोमाटणे फाटा, तळेगाव चौक या ठिकाणी वेश्या व्यसायासाठी महिला उभ्या असल्याचे दिसून येते. या महिला दररोज ठिकाण बदलून महामार्गावर उभ्या राहतात. याव्यतिरिक्त दिघी, आळंदी परिसरात अशा प्रकारच्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हाय प्रोफाइल रॅकेटप्रमाणेच रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करणार्‍या महिलांवरदेखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथक स्थापन करून शहरातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शहराचा पदभार स्वीकारलेले पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीदेखील अवैध धंद्यांना थारा न देता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

तृतीयपंथीयांचेही वेगळे अड्डे

शहर परिसरात केवळ महिलाच नाही, तर तृतीयपंथीयदेखील रस्त्यावर उभे राहून पादचार्‍यांना अश्लील इशारे करतात. त्यामुळे तेथून जाणार्‍या महिलांना मान खाली घालूनच पुढे जावे लागते. दरम्यानच्या काळात तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांच्या वतीने प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा काही ठिकाणी तृतीयपंथी दिसू लागले आहेत.

परप्रांतीय वाहनचालक जाळ्यात
महामार्गावर वेश्या व्यवसायासाठी थांबणार्‍या महिला परप्रांतीय वाहनचालकांना हटकतात. त्यानंतर वाहनचालकांना महामार्गालगतच्या लॉजवर नेले जाते. काही वेळेस महामार्गालगतच्या निर्जन ठिकाणीदेखील असे प्रकार चालतात.

गस्तीवरील पोलिसांचे हवे लक्ष
रस्त्यावर थांबणार्‍या महिलांकडे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण घिरट्या घालत असतात. तसेच, गर्दुल्लेदेखील वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांच्या सभोवताली घुटमळत असतात. काही महिन्यांपूर्वी काळभोरनगर, आकुर्डी येथे प्रीमियर कंपनीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत पैशांच्या कारणावरून दोन तृतीयपंथीयांनी मिळून एका व्यक्तीचा गळा आवळून खून केला होता. त्यामुळे अशा ठिकाणी गस्तीवरील पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची असण्याची गरज आहे.

शहर परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायप्रकरणी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. तसेच, रस्त्यावर उभे राहून अश्लील इशारे करणार्‍या 150 महिलांवर खटले भरण्यात आले आहेत. तरीही काही ठिकाणी असे प्रकार सुरू असल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल.
-देवेंद्र चव्हाण, पोलिस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, पिंपरी- चिंचवड

SCROLL FOR NEXT