पुणे

चिंचवड विधानसभा मतदारसंघ : ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात जमावबंदी

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, 26 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान, थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक प्रक्रियेचे कामकाज चालणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यालय परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे.

त्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे, नामनिर्देशन पत्राची छाननी, नामनिर्देशन पत्र मागे घेणे, यासारखी कामे थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयात होणार आहेत. दरम्यान, चिंचवडच्या जागेसाठी इच्छुकांची संख्यादेखील वाढू लागली आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाबाहेर इच्छुक शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शंका उपस्थित केली जात आहे.

या सर्व बाबींचा विचार करून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 'ग' क्षेत्रिय कार्यालयापासून 200 मीटर अंतरावर काही निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी फौजदारी दंडप्रक्रिया संहिता (सीआरपीसी) 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश दिले आहेत. 10 फेब्रुवारीपर्यंत हे आदेश लागू राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यावर कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

असे आहेत निर्बंध

  • उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांसोबत 3 पदाधिकारी किंवा सूचक / कार्यकर्ते यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस आत जाण्यास मनाई
  • ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालय परिसरात कोणताही प्रचार, सभा व कोणतीही घोषणाबाजी करण्यास मनाई
  • ध्वनिक्षेपकाचा (कोणतेही वाद्य वाजविण्यास) वापर करण्यास मनाई
  • कोणताही मजकूर लिहिण्यास तसेच, छापील मजकूर चिटकविण्यास बंदी
  • नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जात असताना निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयापासून 100 मीटरचे आत फक्त 3 वाहने घेऊन जाण्यास मुभा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT