प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून बहुतांश कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे. राज्यात 2024/25 गाळप हंगामासाठी 31 मार्चअखेर साखरेचे उत्पादन 802.65 लाख क्विंटल (सुमारे 80.26 लाख टन) पर्यंत पोहोचले आहे, जे मागील हंगामाच्या याच कालावधीतील 1085.77 लाख क्विंटल (सुमारे 108.57 लाख टन) होते. त्यामुळे या वर्षी साखरेचे उत्पादन जवळपास 30 लाख मेट्रिक टन कमी आहे.
31 मार्चअखेर राज्यभरातील कारखान्यांनी 847.79 लाख टन उसाचे गाळप केले असून, गेल्या हंगामात याच कालावधीत 1061.19 लाख टन उसाचे गाळप झाले होते. राज्याचा एकूण साखर उतार्याचा दर 9.47 टक्के इतका आहे, जो मागील हंगामात 10.23 टक्के होता. त्यामुळे 0.76 टक्क्यांनी साखर उतारा कमी आहे. कोल्हापूर, सोलापूर व नांदेड विभागातील सर्व कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम संपला आहे.
साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार 31 मार्चअखेर महाराष्ट्रातील एकूण 192 साखर कारखान्यांनी ऊस गाळप समाप्त केले असून यामध्ये सोलापुरातील 45, कोल्हापुरातील 40, पुण्यातील 28, अहिल्यानगर विभागातील 24, छत्रपती संभाजीनगरमधील 21, नांदेडमधील 29, अमरावती विभागातील 3 आणि नागपूर विभागातील 2 कारखान्याचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यात 2024-25 हंगामासाठी 31 मार्चअखेर 192 कारखान्यांनी गाळप हंगाम पूर्ण केला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत राज्यात 170 कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले होते. सद्य:स्थितीत राज्यात 8 साखर कारखान्यांचा ऊस गाळप सुरू असून यामध्ये पुण्यातील 3, अहिल्यानगरातील 2 तसेच नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी 1 कारखान्यांचा समावेश आहे.
गाळप हंगाम सुरू होण्यास उशीर, इथेनॉल उत्पादनाकडे साखर वळणे आणि उत्पादनात घट आदींमुळे राज्यातील साखरेचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत कमी झाल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.