पुणे

श्री भैरवनाथांच्या मुखवट्यांची बैलगाडीतून मिरवणूक; वाल्हेत प्राणप्रतिष्ठा उत्साहात

अमृता चौगुले

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा : वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मुखवटा प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाल्हे येथील कुंभारवाडा येथील देव घरातील श्री भैरवनाथांच्या मुखवट्यांना श्री भैरवनाथ मंदिरात दही, दुधाने स्नान घालून सचिन देशपांडे व पुजारी सचिन आगलावे यांच्या हस्ते रुद्राभिषेक करून विधिवत पूजा केली. दरम्यान, देवदिवाळीचे औचित्य साधून ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांनी सुरुवात करण्यात आली.

या वेळी उजळून आणलेल्या देवाच्या मुखवट्याचे भक्तीमय वातावरणामध्ये मानकरी, सालकरी व गावकरी यांच्या उपस्थितीत सजविलेल्या बैलगाडीमधून मूर्तींची पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. या वेळी "नाथ साहेबाचं चांगभलं"चा जयघोष करण्यात आला. बैलगाडीतून काढण्यात आलेल्या देवाच्या वाजत-गाजत मुखवटा सोहळ्यातील बैलजोडीचे पाय धुवून, मनोभावे पूजन करीत ठिकठिकाणी महिला स्वागत करीत होत्या.

या वेळी वाल्हे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येत या वेळी उपस्थित होते. दरम्यान, सकाळी नऊ वाजता सुरू केलेली मिरवणूक दुपारी एक वाजता कुंभारवाडा (देवघर) येथे आल्यानंतर सालकरी, मानकरी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत देवाची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामस्थांसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT