पुणे

वरकुटे बुद्रुक : खासगी स्कूलबसचा विरुद्ध बाजूने प्रवास

अमृता चौगुले

वरकुटे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा: वरकुटे बुद्रुक, लोणी देवकर परिसरातील विद्यार्थी वाहतूक करणार्‍या खासगी स्कूलबस रस्त्याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करून विद्यार्थी सोडत आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान महामार्गावर अपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पालक आपल्या पाल्याचा सुरक्षित प्रवास व्हावा, या हेतूने खासगी बसमधून शाळेत पाठवत आहेत. मात्र डिझेल आणि वेळेची बचत करण्यासाठी हे बसचालक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने प्रवास करून विद्यार्थ्यांना ने-आण करीत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.

विद्यार्थ्यांना रस्त्याच्या बाजूला सोडून गाडी निघून गेल्यावर विद्यार्थी एकटेच चालत घरी जातात. त्यांच्याबरोबर पालक असतीलच असे नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे, त्यामुळे अशा विरुद्ध दिशेने होणार्‍या प्रवासास वेळीच आळा नाही घातल्यास मोठे अपघात होऊ शकतात. अशा अपघातांची जबाबदारी कोण स्वीकारणार आणि झालेली हानी भरून कशी निघणार, हा प्रश्नच आहे.

  • लोणी देवकर ते वरकुटे पाटीदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार
  • अपघाताची शक्यता; विद्यार्थ्यांच्या जीवितास होऊ शकतो धोका

खासगी शाळांमधील अशा बेशिस्त वाहनचालकांवर संस्थास्तरावर तत्काळ कारवाई व्हावी. शासकीय नियमानुसार घालून दिलेल्या अटी व नियमानुसार न चालणार्‍या स्कूल बसवर गटशिक्षणाधिकार्‍यांनी खातेअंतर्गत चौकशी करत चालक आणि संस्थावर कारवाई करत विद्यार्थ्यांचे जीवाशी होणारा खेळ थांबवावा.
                                                              – शंकर नायकवाडी,
                                           जिल्हाध्यक्ष, शिक्षक प्रदेश काँग्रेस, पुणे जिल्हा.

SCROLL FOR NEXT