पुणे: प्रसूतींसाठी शहरी भागात खासगी रुग्णालयांना, तर ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांना पसंती दिली जात असल्याचे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या आरोग्य अहवालातून स्पष्ट झाले आहे. खासगी आणि शासकीय रुग्णालयांच्या निवडीमध्ये उपचारांचा खर्च महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरी भागांत गेल्या वर्षभरात 50.8 टक्के प्रसूती खासगी, तर 47 टक्के प्रसूती शासकीय रुग्णालयांत झाल्या आहेत. घरातील प्रसूतीचे प्रमाण 2.2 टक्के आहे.
अहवालानुसार, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील विभागणी पाहता ग्रामीण भागात सरकारी आरोग्य सुविधांमध्ये 66.8 टक्के प्रसूती झाल्या, तर खासगी रुग्णालयांमध्ये 28.8 टक्के प्रसूती नोंदविण्यात आल्या. घरातील प्रसूतीचे प्रमाण 4.4 टक्के राहिले आहे. मागील एका वर्षात 96.2 टक्के प्रसूती संस्थात्मक पद्धतीने झाल्या, तर केवळ 3.8 टक्के प्रसूती घरात झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 95.6 टक्के असून, केवळ 4.4 टक्के प्रसूती घरात झाल्या. शहरी भागात हे प्रमाण आणखी जास्त असून, 97.8 टक्के प्रसूती रुग्णालयांमध्ये झाल्या, तर फक्त 2.2 टक्के प्रसूती घरात झाल्या. यावरून ग््राामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये सुरक्षित प्रसूतीसाठी महिलांचा रुग्णालयांकडे वाढता कल दिसून येत आहे.
देशातील चित्र काय?
राष्ट्रीय पातळीवरील एकत्रित आकडेवारीनुसार, सरकारी रुग्णालयांमध्ये 61.7 टक्के प्रसूती झाल्या, तर 34.5 टक्के प्रसूती खासगी रुग्णालयांमध्ये झाल्या. सुरक्षित मातृत्व, जनजागृती आणि आरोग्य सुविधांचा विस्तार यामुळे संस्थात्मक प्रसूतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
संस्थात्मक व घरातील प्रसूती
ग्रामीण : संस्थात्मक 95.6% | घरात 4.4%
शहरी : संस्थात्मक 97.8% | घरात 2.2%
सरकारी विरुद्ध खासगी रुग्णालये
ग्रामीण : सरकारी 66.8%, खासगी 28.8%
शहरी : सरकारी 47%, खासगी 50.8%