मंचर : पुढारी वृत्तसेवा : निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथील पृथ्वीराज जयसिंग निघोट या तरुणाची सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. त्याच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. निघोटवाडी येथील शेतकरी कुटुंबातील जयसिंग निघोट हे आयकर विभागात कार्यरत आहेत. कामानिमित्त निगडी पुणे या ठिकाणी राहतात. त्यांचा मुलगा पृथ्वीराजला लहानपणापासून खेळात व संशोधन क्षेत्रात करियर करण्याची इच्छा होती. वडिलांनी त्याला सैन्यात तुझ्या या दोन्ही इच्छा पूर्ण होतील, असे सांगून त्याला सैन्य दलात भरती होण्याचा सल्ला दिला.
पृथ्वीराजचे निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालय येथे प्राथमिक व दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. निगडी येथे सैन्य दलाच्या व्याख्यानात त्याला सैन्य दलात एनडीएचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची औरंगाबाद येथे संस्था असल्याचे समजले. तेथे प्रवेश मिळवण्यासाठी पूर्व परीक्षेची माहिती घेऊन पृथ्वीराजने पूर्व परीक्षा दिली. औरंगाबाद येथे एनडीएत निवड झाली. दोन वर्षे अकरावी, बारावी विज्ञान व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची एनडीए प्रशिक्षणासाठी निवड झाली. तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वर्ष डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अकॅडमी येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्याची लेफ्टनंटपदी निवड झाली. सध्या तो आसाम येथे कार्यरत आहे.
आईने मुलाचे आयुष्य घडवले
मी नोकरीवर जात असे. त्यामुळे घर व मुलांची जबाबदारी निघोट यांच्या पत्नी सुवर्णा या पाहत होत्या. मुलाचे 10 वी पर्यंत शिक्षण होईपर्यंत त्याला कुठलाही बाहेरचा क्लास न लावता आईने घरीच अभ्यास घेतला. मुलाचे अभ्यासात लक्ष लागावे, मुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आईने आपली हौसमौज बाजूला ठेवत घरात कुठलीही महागडी वस्तू खरेदी केली नाही. पृथ्वीराजला घडविण्यात त्याच्या आईचा सिंहाचा वाटा आहे, असे जयसिंग निघोट सांगतात.