पुणे

राजकारणाची दशा पाहून चिंता वाटते; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'महाराष्ट्राचे राजकारण हे देशाला दिशा देणारे असते. पण, आज महाराष्ट्राच्या राजकारणाची जी दशा झाली आहे ते पाहून चिंता वाटते. आगामी लोकसभेच्या निवडणुकांवर परिणाम व्हावेत म्हणूनच महाराष्ट्रात हे राजकारण घडवण्यात आलेले आहे,' असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. देशात राज्यघटना व लोकशाहीला धोका निर्माण झाला असून, अशा परिस्थितीत 'आयडिया ऑफ इंडिया' जपण्यासाठी देशभरात बंधुत्वभाव वाढविणार्‍या कार्यक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरहद संस्थेतर्फे देण्यात येणारा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत नवतेज सरना यांना चव्हाण यांच्या हस्ते प्रदान केला. त्या वेळी चव्हाण बोलत होते. ज्येष्ठ बँकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे, 'सरहद'चे संस्थापक संजय नहार, मुख्य संयोजक संतसिंग मोखा, अरुण नेवासकर, श्रीराम पवार उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, की लोकशाही आणि घटना यांना धोका निर्माण होण्याची परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण होते आहे, अशा परिस्थितीत दोन राज्यांमध्ये दुवा निर्माण करणारे असे कार्यक्रम आशा निर्माण करतात. राजदूत म्हणून काम करताना भारताचे विविध देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणारे पंजाबचे सुपुत्र नवतेज सरना यांना दिलेल्या या पुरस्काराने महाराष्ट्र व पंजाबमधील भावनिक ऐक्य आणखी वाढले आहे.

हिंसेला प्रेम हेच उत्तर

सरना म्हणाले, 'हिंसेला उत्तर हिंसा नाही, तर प्रेम आहे, हे सांगणार्‍या सरहद संस्थेचा पुरस्कार मला मिळाला आहे, याचा आनंद आहे. प्रतिकूल परिस्थितीत असतानाही आपण देशाची सेवा करीत आहोत, याच भावनेने आजवर मी काम केलेले आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT