पुणे

पुणे : कैद्यांना मिळेना खटल्याची माहिती; नातेवाईक, वकिलांच्या भेटीनंतरच मिळतात खटल्याचे अपडेट

अमृता चौगुले

शंकर कवडे

पुणे : कारागृहात बंदी असलेल्या कैद्यांना न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजाची माहिती मिळविण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. कारागृहातील मुलाखतीसाठी अपुरा वेळ तसेच वेळखाऊ प्रक्रियेमुळे कैद्यांना न्यायालयातील खटल्याची कोणी माहिती देता का माहिती, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

न्यायालयात खटल्यासंदर्भात कागदपत्रे दाखल झाल्यानंतर खटल्यास सुरुवात होते. यादरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज, पोलिसांचा अहवाल त्यांचे म्हणणे आदी गोष्टी न्यायालयापुढे सादर केल्या जातात. यामध्ये बहुतांश वेळा कैदी न्यायालयात हजर नसतात. त्यामुळे, कैद्यांना आपला खटला कोणत्या टप्प्यावर आला, त्यावर पोलिसांचा अहवाल दाखल झाला का, तसेच पोलिसांचे काय म्हणणे आहे, हे समजून येत नाही. या खेरीज, आपले प्रकरण युक्तिवादासाठी कधी ठेवण्यात आले आहे, तसेच कामकाज नेमके कशा प्रकारे सुरू आहे, याचा काहीच अंदाज येत नाही.

कारागृहातील कैद्याला व्हीसी अथवा प्रत्यक्ष हजर केल्यानंतर फक्त मिळालेली तारीख समजते, मात्र, खटल्याचे कामकाज नक्की काय चालले आहे, तेच समजत नाही. जे कैद्याच्या अधिकारांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कैद्यांच्या वकिलांना प्रत्येकवेळी कारागृहात जाऊन वेळखाऊ मुलाखतीची प्रक्रिया करून आरोपीला खटल्याची अन्य माहिती देणे शक्य होत नाही. यामध्ये, कैद्याला माहितीपासून वंचित राहावे लागत असल्याने कारागृहात कैद्यांसाठी 'किऑस्क' मशिन उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

माहितीसाठी कारागृहात किऑस्कची आवश्यकता
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांची पुढील आणि मागील तारीख, पक्षकारांचे नाव, पत्ता, वकिलाचे नाव, कोर्ट नंबर, रजिस्ट्रेशन तारीख, एफआयआर क्र., कोर्टातील आजचा व उद्याचा दैनंदिन बोर्ड, पार्टीचे नाव, प्रकरण कोणत्या कोर्टात आहे त्यांचे नाव, आजतागायत किती तारखा झाल्या, याची सर्व माहिती 'किऑस्क'मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. यासह न्यायालयामार्फत अपलोड करण्यात आलेले जामिनाबाबतचे अंतरिम आदेशही 'किऑक्स'द्वारे पाहता येतात.

किऑस्क मशिनची सुविधा ही कैद्यांच्या दृष्टीनेही मोठी फायद्याची आहे. खटल्यासंबंधित बहुतांश माहितीसाठी कैद्यांना वकील, तसेच नातेवाइकांवर अवलंबून राहावे लागत आहे. कारागृहात किऑस्क मशिन उपलब्ध झाल्यास कैद्यांना त्यांच्या खटल्यांसंबंधी सर्व माहिती उपलब्ध होईल. त्यानंतर, कैद्यांना वकील व घरच्यांच्या मुलाखतीसाठी अवलंबून राहावे लागणार नाही.
                                                                 – अ‍ॅड. पुष्कर दुर्गे

न्यायालयात पक्षकारांसाठी ज्याप्रकारे किऑक्स मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्याप्रमाणे कारागृहातही असणे गरजेचे आहे. कारण, खटल्याची प्रत्येक माहिती कारागृहात जाऊन देणे हे शक्य नाही. सध्याच्या परिस्थितीत डिजिटल प्रणालीचा वापर कारागृहातही होणे आवश्यक आहे. यामुळे, वकीलवर्गासह कारागृह प्रशासनाचा वेळ वाचेल.
                                                        – अ‍ॅड. कमलेश गावडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT