पुणे: पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळ क्षेत्रात येणार्या सात गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जमीन खरेदीची उड्डाणे वाढली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत शासनाच्या तिजोरीत 4 कोटी 19 लाख 72 हजार 525 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सात गावांमधील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. या भागात जमीन खरेदी करण्यासाठी आता मात्र सोन्याचा भाव आला आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव मेमाणे या सात गावांमध्ये सुमारे 3 हजार 265 सर्व्हे क्रमांक आहेत. त्यामध्ये 2 हजार 673 हेक्टर 972 आर एवढी जमीन आहे. मात्र, या भागात विनानतळ भूसंपादन अधिसूचना निघण्यापूर्वीच या गावांतील जमिनीच्या व्यवहारांवर निर्बंध येईपर्यंत या गावांमधील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सन 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या विमानतळाची जागा बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. त्यानंतर पुन्हा राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा पुरंदर तालुक्यातील पूर्वीच्याच जागांवर म्हणजेच संबंधित सात गावांमध्ये विमानतळ उभारण्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.
या विमानतळाबरोबरच कार्गो करण्याचेही जाहीर केले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार) या राजकीय पक्षांची सत्ता पुन्हा राज्यात आली. त्यानंतर पुरंदर विमानतळाच्या हालचालींना गती मिळाली.
दरम्यान, विमानतळ होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी जमिनीच्या बदल्यात समृद्धी महामार्ग, रिंगरोडच्या धर्तीवर चार ते पाचपट अधिक मोबदला मिळणार असल्याचे अनेकांनी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदी केली असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा (ग्रामीण ) सहजिल्हानिबंधक विभागाने दिलेल्या आकडेवारी-वरून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सध्या पुरंदर तालुक्यातील या सात गावांमधील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत.
महसुलाची आकडेवारी
गेल्या दोन वर्षांत पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील झालेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारामुळे नोंदणी विभागाला मिळालेल्या महसुलाची आकडेवारी
2023- 127 दस्तनोंदणी महसूल
मुद्रांक शुल्क: 1 कोटी 10 लाख 270
नोंदणी शुल्क: 25 लाख 55 हजार 19
एकूण: 1 कोटी 55 लाख 58 हजार 289 रुपये
2024 - 327 दस्तनोंदणी
मुद्रांक शुल्क: 2 कोटी 34 लाख 62 हजार 745
नोंदणी शुल्क: 41 लाख 51 हजार 491
एकूण: 2 कोटी 76 लाख 14 हजार 236 रुपये
दोन वर्षांचे मिळून एकूण (2023-2024)
दस्तनोंदणी: 451
मुद्रांक शुल्क: 3 कोटी 44 लाख 76 हजार 15 रुपये
नोंदणी शुल्क: 74 लाख 96 हजार 510 रुपये
एकूण: 4 कोटी 19 लाख 72 हजार 525 रुपये
गेल्या दोन वर्षांत पुरंदर तालुक्यात प्रस्तावित विमानतळामुळे संबंधित गावांमधील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाच्या महसुलात चांगलीच भर पडली आहे.- प्रवीण देशपांडे, सहजिल्हानिबंधक,पुणे जिल्हा (ग्रामीण)