पुणे

बहाणा अपघाताचा अन् धंदा लुटीचा; त्रिकुटाला दत्तवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अपघात झाल्याच्या बहाण्याने शहरातील वाहनचालकांना लुटणार्‍या टोळीचा दत्तवाडी पोलिसांनी पर्दाफाश करून, एका महिलेसह तिघांना अटक केली. टोळीने आत्तापर्यंत तब्बल 40 जणांना अशाप्रकारे लुटले असून, विविध यूपीआय खात्यावरून त्यांच्याकडे 9 लाख रुपये आल्याचे पोलिसांनी सांगितले. इरफान इस्माईल सय्यद (वय 30, रा. साडेसतरानळी रोड, माळवाडी हडपसर), शरद उर्फ डॅनी रावसाहेब आहिरे (वय 26, रा. म्हाळुंगे-नांदे,चांदे रोड), सविता लक्ष्मण खांडेकर (रा. गोपाळपट्टी मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

10 डिसेंबर रोजी केतनकुमार होवाळ (वय 30, रा. संतोषनगर कात्रज, मूळ – कराड) हे रात्री दहा वाजताच्या सुमारास कामावरून घरी निघाले होते. त्यावेळी सिंहगड रोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या तिघा आरोपींनी त्यांना थांबविले. तुझ्याकडून पाठीमागे दोन अपघात झाले आहेत, त्याचा 40 हजार रुपये खर्च आहे तो दे असे सांगून धमकी दिली होती. फिर्यादींना जबरदस्तीने मित्राकडून फोन पेद्वारे पैसे घेण्यास भाग पाडून 20 हजार रुपये तर एटीएममधून 20 हजार रुपये असे चाळीस हजार रुपये त्यांच्याकडून तिघांनी जबरदस्तीने काढून घेतले होते. त्यांना जबर मारहाणही केली होती. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.

दाखल गुन्ह्याचा दत्तवाडी पोलिसांकडून तपास सुरू होता. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजद्वारे हा गुन्हा हडपसर परिसरात राहणार्‍या आरोपींनी केला असून, ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पथकाने सापळा रचून तिघांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. टोळीचा मुख्यसूत्रधार इरफान याच्या बँक खात्यात गेल्या एक वर्षात 9 लाख रुपये आले असून, ते चाळीस पेक्षा अधिक लोकांच्या बँक खात्यातून आले आहेत.

टोळीने हडपसर, शिवाजीनगर, बंडगार्डन, वानवडी, हडपसर व मुंढवा परिसरात असे गुन्हे केले असून, चार गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी पोलिस उपायुक्त सुहैल शर्मा, सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक विजय खोमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, हवालदार कुंदन शिंदे, कर्मचारी प्रशांत शिंदे, किशोर वळे, दयानंद तेलंगे पाटील, सद्दाम शेख, रेवननाथ जाधव, प्रकाश मरगजे, अमोल दबडे, अमित सुर्वे, अमित चिव्हे, प्रमोद भोसले यांच्या पथकाने केली.

सराईत गुन्हेगार..
इरफान आणि शरद ऊर्फ डॅनी हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांनी आपल्या टोळीत एका महिलेचादेखील समावेश करून घेतला आहे.

स्वच्छतागृहात जाणारेही टार्गेट
शौचालयात गेलेल्या नागरिकाला एकटे हेरून ही टोळी टार्गेट करत होती. त्याच्यासोबत अश्लील चाळे करून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डींग करून पोलिसात देण्याची धमकी देऊन, प्रसंगी मारहाण करत जबरदस्तीने नागरिकांकडून पैसे घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

टोळीने अद्यापपर्यंत चाळीस नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. त्यातील दोघा आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अशाप्रकारे जर कोणाला जबरदस्तीने लुटण्यात आले असेल तर, त्यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.
                                                                            – अभय महाजन,
                                                                 वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दत्तवाडी

SCROLL FOR NEXT