पुणे

पिंपरी : जागतिक मराठी संमेलनात हृदयस्पर्शी कवितांचे सादरीकरण

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातून आलेल्या कवींनी सादर केलेल्या हृदयस्पर्शी व वास्तवाला भिडणार्‍या कविता, प्रसिद्ध महिला चित्रकार व शिल्पकारांनी हुबेहूब सादर केलेल्या कलेच्या आविष्काराचे सप्तरंग शनिवारी (दि. 8) रसिकांना लुभावून गेले.
निमित्त होते जागतिक मराठी अकादमी व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (पिंपरी) आयोजित 18 व्या जागतिक मराठी संमेलनात सादर झालेल्या 'चित्र- शिल्प- काव्य' या कार्यक्रमाचे. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध कवी व जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष फ. मु. शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, महेश केळुसकर, श्रीकांत कदम यांनी सूत्रधार म्हणून भूमिका बजावली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी पाटील यांनी सर्व कवींचा तसेच चित्रकार व शिल्पकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. सुरभी गुळवेलकर या मुलीने अशोक नायगावकर यांचे समोर बसून काढलेले चित्र, हर्षदा कोळपकर यांनी काढलेले रचनाचित्र तर शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे यांचे समोर बसवून निर्माण केलेले शिल्प हे कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरले. कवी प्रशांत मोरे यांच्या रचनेने काव्य मैफिलीला सुरुवात झाली. त्यानंतर इंद्रजीत घुले यांच्या 'लग्नातलं जेवण' या कवितेने हास्यरंग विखुरले. लता अहिवळे यांच्या 'बाप' या कवितेने रसिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. भरत दौंडकर यांनी 'अंदाज येत नाही' ही कविता सादर केली. नारायण पुरी यांच्या 'जांगडगुत्ता' या कवितेने वन्समोअर घेतला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू एन. जे. पवार, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, अशोक नायगावकर, फ. मु. शिंदे यांनीही कविता सादर केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT