पुणे: केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत 10 वर्षांपूर्वी सुरू केलेला स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळला आहे. पुण्यात देखील हा प्रकल्प राबवला. या प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च केले असून, या प्रकल्पामुळे शहरात नेमके काय साधले गेले, पुण्यात कोणती विकासकामे झाली, याची माहिती पुणेकरांना दिली जावी, अशी मागणी आपलेपुणे आणि आपला परिसर संस्थेने केली आहे.
केंद्र सरकारने 2015 मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प देशभरात राबवला. यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचा यात समावेश केला होता. मात्र, 31 मार्चपासून हा प्रकल्प गुंडाळला असून, यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा निधी हा थांबवला आहे. पुणे महापालिकेने या प्रकल्पांसाठी औंध, बाणेर व बालेवाडीची निवड केली होती. तसेच, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची देखील स्थापना केली होती.
केंद्र सरकार या प्रकल्पासाठी दोन्ही पालिकांना 100 कोटींचा निधी देणार होती, तर या प्रकल्पासाठी महापालिका 50 कोटींचे अनुदान देणार होती. या भरघोस निधीतून शहरात विविध प्रकल्प व विकासकामे राबवले जाणार होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाची घोषणा पुण्यातून केली होती. मात्र, आता हा प्रकल्प बंद केला आहे. त्यामुळे साहजिकच शहरातील स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू केलेले सर्व प्रकल्प आता महापालिकेकडून पूर्ण कारणात येणार आहेत. त्यामुळे पुण्यात या प्रकल्पाने काय साध्य केले, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, अशी मागणी आपले पुणे, आपला परिसर संस्था व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संयोजक उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्ष नेता सुहास कुलकर्णी व प्रशांत बधे यांनी केली आहे.
...या प्रकल्पांचा समावेश
पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मोठे रस्ते, पदपथ. उद्याने, नागरी प्रकल्प, नागरिकांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी 3 चौरस किलोमीटरचे क्षेत्र देखील निश्चित करण्यात आले होते. या प्रकल्पात पुण्यात एटीएमएस ही अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, पीएमपीसाठी ई-बस खरेदी, सायकल योजना, थीम बेस उद्याने, स्मार्ट पदपथ यांसारखे प्रकल्प राबवण्यात आले आहेत.