पुणे

पुणे : निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करा: विरोधी पक्षनेते अजित पवार

अमृता चौगुले

पुणे : आगामी महापालिका निवडणूक तीन किंवा चारसदस्यीय प्रभागपद्धतीने होईल. कितीचाही प्रभाग झाला, तरी निवडणूक लढवायचीच आहे. आघाडी होईल किंवा नाही, याचा विचार न करता स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, अशा सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना केल्या. पवार यांनी केसरीवाडा येथे शुक्रवारी (दि. 23) कसबा, शिवाजीनगर, कोथरूड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. त्या वेळी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, 'पालघरमध्ये केंद्रीय मंत्री गेले, तर प्रसिद्धी मिळत नाही. मात्र, बारामतीत गेल्यावर 'ब्रेकिंग' होते. त्यामुळे भाजप नेते बारामतीला येतात, त्यात वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल ते म्हणाले, 'काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांना शांत झोप लागते. त्यांनी उमेदवारी घ्यावी. आम्ही आमचे काम दाखवू. बारामतीची जनता कुठले बटन दाबायचे ते दाबेल.'

वेदांता फॉक्सकॉनबद्दल शरद पवार आणि तुमच्यावर आरोप होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, 'वेदांता'ला काय सवलती द्यायच्या, याबाबत राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी 15 जुलै रोजी बैठक घेतली होती.' कुणी बिनबुडाचे आरोप करीत असेल तर त्याला किती महत्व द्यायचे? असेही ते म्हणाले.

'ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाल्याने आनंद'
शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. उद्धव ठाकरे हेच माझ्यानंतर शिवसेनाप्रमुख असतील, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. न्यायव्यवस्थेने दसर्‍याची सभा घेण्यास उद्धव ठाकरे यांना परवानगी देऊन शिवसेनेला न्याय दिला, याचा मला आनंद आहे. ज्यांना एकनाथरावांचे विचार ऐकायचे आहेत, त्यांनी बीकेसीला जावे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT