डोर्लेवाडी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बिजोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. देहूनंतर डोर्लेवाडी गावात तुकाराम महाराज बिजोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा या उत्सवाचे 64 वे वर्ष आहे. बिजोत्सवाच्या नियोजनासाठी तुकाराम महाराज मंदिरात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोर्लेवाडी येथील बिजोत्सवाचे उत्सव कमिटीच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.
बुधवारी (दि. 8) कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 9) सकाळी 6 वाजता संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची विधिवत पूजा व महाआभिषेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 9 ते 10 या वेळेत बाळासाहेब नाळे यांचे प्रवचन होणार आहे. 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर पुष्पवृष्टी होत मुख्य उत्सवास सुरुवात होणार आहे, असे उत्सव कमिटीतर्फे सांगण्यात आले.
पन्नास हजार चौरस फुटांचा मंडप
तुकाराम महाराज बिजोत्सव दुपारी 12 वाजता असल्याने भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी मंदिर परिसरात सुमारे 50 हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली.