मर्दानी दसरा  Pudhari
पुणे

राजेशाही मर्दानी दसर्‍याची तयारी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

कर्‍हा तिरी असे मोरगाव,

तिथे नांदतो मोरया देवराव!

चला जाऊ यात्रेचे महापुण्य आहे

मनी इच्छिले मोरया देत आहे!!

विजयादशमी हा समस्त मोरगाववासियांचा आनंद सोहळा. मोरगाव (ता. बारामती) येथील राजेशाही मर्दानी दसरा छत्रपती शाहू महाराज सातारकर यांच्या आज्ञेनुसार वैभवशाली परंपरेनुसार सुरू आहे. मोरगाव येथील पुजारी (गुरव) सीताराम दत्तात्रय धारक (वय 84) यांनी या राजेशाही दसर्‍याची माहिती दिली.

पुजारी धारक यांनी सांगितले की, दसर्‍याला पहाटे पाच वाजता पाच तोफांचे पाच आवाज काढले जातात. पाच तोफा सोनोरी येथील पानसे सरदाराने श्री मयुरेश्वरास दिल्या आहेत. या तोफांचे मानकरी वाघू अण्णा वाघू, भिकाजी गणेश वाघ, सदाशिव बाळकृष्ण वाघ हे आहेत. या तोफांना दारुगोळा वाटपाची पाहणी भारत सासवडे (कासार) यांची मुले परंपरेनुसार पाहत आहेत. दारुगोळा भरणारी मंडळी नाईक, जाधव, चव्हाण, जगताप, तावरे, सणस, पवार, माडकर ही आहेत.

मयुरेश्वराची पहिली पूजा धारक गाडी परिवार पाहतात. श्री मयुरेश्वराला पहाटे गरम पाण्याने अभ्यंग स्नान घातले जाते. सालकरी ढेरे यांची सकाळी सात वाजता पूजा होऊन मंगल वाद्य वाजवून धुपारती केली जाते. मंदिरात सर्व गावकरी येऊन शोभेच्या दारूची आतिषबाजी करतात. सकाळी नऊ वाजता मंदिरासमोर पालखीचे नियोजन करण्यासाठी गावकर्‍यांची बैठक होते. दारूगोळ्याच्या आत जे नळे वापरले जातात ते पोयटा मातीपासून बनवले जातात, हे नळे कुंभार मंडळी तयार करतात.

बैठक झाल्यावर गाव मानकर्‍यांना शिधावाटप केले जातो. सर्व सेवेकरी, चौघडेवाले, नगारेवाले, हिलालवाले, पंखेवाले, छत्रीवाले आणि राजदंड चव्हाण मंडळी, भालदार-चोपदार, हलगीवाले हे शिधा वाटपाचे मानकरी आहेत. वाटपावेळी विद्याधर वाघ हे सेवेकरांची नावे वाचतात. दुपारी तीन वाजता श्री मयुरेश्वरास पेशवेकालीन दागदागिने आणि पोशाख धारक व गाडे परिवार करतात.

दुपारी चार वाजेनंतर सर्वांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. रात्री 8.30 वाजता पालखी सीमोल्लंनासाठी निघते. यावेळी श्री मोरयासमोर पाच तोफाचे आवाज काढले जातात. भक्तगण फरसावर भव्य अशी दारूगोळ्याची आतिषबाजी आणि शोभेची आतिषबाजी करतात. बाजार तळावर दुष्ट प्रवृत्तीची प्रतिकृती तयार केली जाते. तिचे रात्री 12 वाजता दहन केले जाते. त्यानंतर पालखी पिंजरी काढली जाते. यावेळी देवास रेशमी गोफात बांधले जाते. चिंतामणी मोरया गोसावी यांची आरती केली जाते. पिंजारीचे मानकरी रायचंद पुंजाराम शहा यांचे वंशज शैलेश शहा यांच्याकडे पिंजारी दिली जाते. हरमाळीचा खेळ खेळला जातो. नंतर पालखी फिरंगाई देवी मातेकडे जाते. गोंधळी आणि गोंधळ घातल्यावर पालखी बुद्धिमत्ता मंदिराकडे जाते. तेथे आरती होते. त्यानंतर तुकाई मातेच्या मंदिरात आल्यावर आरती करून पालखी गावात येते. येथील महादेव मंदिरात आरती होते. त्यानंतर तेथे श्री मरीमाता, श्री मारुती, श्री भैरवनाथ, श्री कालिकादेवी यांच्या आरत्या केल्या जातात आणि पालखी बारामती ते जेजुरी रस्त्याला येते. पालखी सिद्धार्थ नगर, ब—ाह्मण आळी, कुंभारवाडा ते सोनोबा मंदिराकडे जाते. यावेळी ग्रामस्थ पालखीसमोर आतषबाजी करतात.

सोनोबाच्या मंदिरात तीन जथेंच्या पाटलाने आपटा पूजन करून ग्रामजोशी दिलीप वाघ हे पूजा करतात. या पूजेनंतर तीन जथाचे पाटील पालखी ठेवतात. यानंतर वंशावळी वाचन शाहू महाराजांचे मुजुमदार वाघ करतात. नंतर पहिला अंगारा आपट्याचा प्रसाद शैलेश वाघ यांना दिला जातो. त्यानंतर संस्थांनानुसार आणि मानानुसार सर्व मंडळींना अंगारा व आपट्याची मात्रा दिली जाते. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सीताराम दत्तात्रय धारक हे प्रसाद वाटप करतात.

यानंतर पालखी धनगर वाड्याकडे येते. या ठिकाणी झाडाझुडपामध्ये तोफांचे आवाज काढले जातात. पालखी माळी, लोहारा आळीतून ग्रामपंचायतीपासून चिंचेच्या बागेतून जाते. फेरीवाल्याला ललकारी देऊन पिंजरी चढवली जाते. पुन्हा पालखी श्रीमहादेव, श्रीमारुती मंदिरात आरती करून, मुख्य पेठेतून मंदिरात येते. यावेळी गोसावी मंडळींची आरती असते. त्यांना ललकारी देण्याचे काम अंकुश लंबोदर धारक करतात. मंडळी पंचारतीवरून आरती करतात. असा हा मयुरेश्वराचा राजेशाही मर्दानी सोहळा ऐतिहासिक असल्याची माहिती सीताराम दत्तात्रय धारक पुजारी (गुरव) यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT