पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोजागरी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी शहराच्या विविध भागांतील महापालिकेची मोठी उद्याने आज (रविवारी) रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली आहे. महापालिकेच्या उद्यानांमध्ये कोजागरी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यास दरवर्षी प्रशासनाकडून परवानगी दिली जाते. दररोज रात्री आठ वाजता बंद होणारी शहरातील मोठी उद्याने कोजागरीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली जातात. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे मागील दोन वर्षे कोजागरीच्या दिवशीही उद्याने बंद ठेवण्यात आली होती.
यंदा मात्र सर्व निर्बंध शिथिल असल्याने सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पूर्वीप्रमाणे यंदाही कोजागरीसाठी महापालिकेची मोठी उद्याने रात्री दहापर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सारसबाग, डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान, मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका उद्यान, कोथरूड येथील थोरात उद्यान, सोमवार पेठेतील शाहू उद्यान, कमला नेहरू उद्यान, हडपसरमधील लोहिया उद्यान, सहकारनगरमधील काकासाहेब गाडगीळ उद्यान यांसह त्या त्या भागातील मोठी उद्याने खुली ठेवण्यात येणार असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.