File Photo  
पुणे

पुणे : मुली लवकर वयात येण्याचे प्रमाण वाढतेय

अमृता चौगुले

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : 'आई खूप पोट दुखतंय गं, काय करू?', 'शाळेतलं टॉयलेट खूप अस्वच्छ आहे, मी सुट्टी घेऊ का चार दिवस?', 'खेळायलाही नाही जायचं का आज मी?' असे अवघ्या दहा-अकरा वर्षांच्या मुलीचे संवाद ऐकून आईला गहिवरून येते. मोकळेपणाने हुंदडण्याच्या वयातच मासिक पाळी सुरू झाल्याने मुलीला काय आणि कसे समजवायचे? असा प्रश्न आईला पडल्याशिवाय राहत नाही. या वयात मुलींमध्ये होणारी मानसिक, शारीरिक आंदोलने समजून घेणे, मुलींशी संवाद साधणे, त्यांची मैत्रीण होणे आवश्यक असल्याचे मत स्त्रीरोगतज्ज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे.

गेल्या दहा वर्षांत मुली लवकर वयात येण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. आता अगदी आठव्या-नवव्या वर्षापासून मासिक पाळी सुरू होते. बदलती जीवनशैली, आहार-विहार, प्लास्टिकचा वाढता वापर, प्रदूषण, शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन तसेच इतर अनेक अज्ञात कारणांमुळे मुली लवकर वयात येऊ लागल्या आहेत.

मुलांच्या तुलनेत मुलींची प्रजनन संस्था गुंतागुंतीची असते. मुलींमधील वयात येण्याची प्रक्रिया पाळीच्या दोन-तीन वर्षे आधीच सुरू होते. यामध्ये लहान वयातच मुलींच्या छातीची वाढ सुरू होते, काखेत केस येऊ लागतात, उंची वाढत नाही आणि हार्मोन्सचा स्राव मात्र सुरू होतो. अशा उदाहरणांमध्ये मुलींचे मानसिक वय लहान असते. शारीरिक वाढ कमी झालेली असते.

मात्र, हार्मोनल बदलांमुळे त्यांच्यामध्ये प्रचंड मानसिक आणि शारीरिक आंदोलने सुरू होतात. अशा वेळी त्यांच्या आयुष्यात भयंकर काहीतरी घडत आहे, असे न भासवता बदलांमध्ये साहजिकता आणण्याचे काम पालकांनी करणे आवश्यक असते, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लीना देशपांडे यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केले.

आता लवकर मासिक पाळी यायला सुरुवात झाली आहे. मुळात वयात येणे किंवा प्युबर्टी पूर्णपणे नैसर्गिक आहे. आपल्या मेंदूमध्ये वयात येण्याशी संबंधित हार्मोन्स आणि गर्भाशयातील हार्मोन्स सक्रिय झाले की मासिक पाळीची सुरुवात होते. प्रसारमाध्यमे, शिक्षणपध्दतीमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक विकास लवकर होऊ लागला आहे. अयोग्य खाण्याच्या पध्दती, इंटरनेट वापराचे वाढते प्रमाण, वाढलेले वजन यांचाही परिणाम होतो.
                                                             – डॉ. वैजयंती पटवर्धन, स्त्रीरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT