मुंढव्यात वाहतूक नियमन करताना प्रताप दगडे 
पुणे

पुणे : रिक्षावाले काकांचे वाहतूक नियोजन; प्रताप दगडे यांचे होतेय सर्वत्र कौतुक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: रिक्षा व्यवसाय करून संसार चालविणारे प्रताप दगडे हे व्यवसाय सांभाळून मुंढव्यातील महात्मा फुले चौकात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीचे नियोजन करीत आहेत. विशेष म्हणजे ते करीत असलेल्या सामाजिक कामाची क्लिप सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. समाजामातून आता त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ लागली आहे.
मुंढव्यातील महात्मा फुले चौकात कायमच प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.

मात्र, या कोंडीतही एक चेहरा वाहतूक सुरळीत करताना दिसतो. तो म्हणजे 'रिक्षावाले काका' अर्थात प्रताप दगडे यांचा!. मुंढवा-केशवनगर भागातील वाहतूक कोंडी गेल्या पाच-सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रस्त्यावर येणार्‍या वाहनांची संख्या जशी वाढेल तशी वाहतूक कोंडी वाढणारच आहे. प्रत्येक घराघरांत दोन ते तीन दुचाकी आहेतच. पीएमपीएल सेवाही आता अपुरी पडत आहे. त्यामुळे स्वतःचे वाहन असावे, हे प्रत्येकालाच वाटत आहे. त्यातूनच वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडीही वाढत आहे.

ही वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून व्यवस्थेवर आपण कायमच खापर फोडत असतो. मात्र, समस्येवर चर्चा करण्यापेक्षा रिक्षावाले काका प्रताप दगडे हे व्यवसायाबरोबरच एक सामाजिक बांधिलकी समजून दररोज या चौकात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाह्तूक पोलिसांना मदत करीत आहेत. अनेक वाहनचालकांना ही व्यक्ती रोज वाहतूक सुरळीत करताना कायम दिसत आहे.

रिक्षावाले काका दगडे हे मुंढवा गावातील महात्मा फुले चौकात वाहतुकीचे नियमन कोणतीही अपेक्षा न करता केवळ सामाजिक कार्य आणि वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी करीत असल्याचे सांगतात. त्यांच्या या कामाची एक क्लिप मुंढवा येथील एका युवकाने फेसबुकवर पोस्ट केली. सध्या या पोस्टचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

वाहतूक कोंडी सुटण्यासाठी…
निस्वार्थीपणे काम करणार्‍या दगडे यांना वाहतूक विभागाने काहीतरी मोबदलाही द्यावा, अशी मागणी एका युवकाने तयार केलेल्या पोस्टमध्ये केली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येला आपणा सर्वांनाच सामोरे जावे लागते. वाहतूक कोंडी आपल्यामुळेच होते आहे. परंतु ही कोंडी सुटावी व इतर नागरिक लवकर घरी जावेत, यासाठी प्रयत्न करण्याचा मानस प्रत्येकाने ठेवला पाहिजे, असे दगडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT