पुणे : खराडी पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गु्न्हा दाखल करण्यात आला. एका महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढल्याप्रकरणात तिने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता ७७, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ (ई ) अन्वये डॉ. खेवलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (Pune Latest News)
खराडीतील एका हॉटेलमध्ये २५ जुलै रोजी झालेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला. या प्रकरणी डॉ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद, सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा यांना अटक करण्यात आली. यावेळी एका महीला आरोपीकडून २ ग्रॅम ७० मिलीग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाइल, सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
डॉ. खेवलकर यांच्याविरुद्ध एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. डॉ. खेवलकर यांनी खराडीतील हॉटेलमध्ये यापूर्वी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत तरुणींना बोलाविण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संबंधित संस्थेने केली होती. त्यानुसार राज्य महिला आयेगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना नुकतेच दिले. याबाबत महिला आयोगाकडून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पत्र देण्यात आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी डॉ. खेवलकर यांचा दुसरा मोबाइल , कॅमेरा, लॅपटॉप जप्त केला आहे, तसेच संबधित हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चित्रीकरण साठविणारे यंत्र (डीव्हीआर) ताब्यात घेतला आहे. उर्वरित सहा आरोपींचे मोबाइल आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात एक महिलेने सायबर पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली आहे. २०२२ ते जून २०२५ या कालावधीत डॉ. खेवलकर यांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून त्यांचे निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे काढली. महिलेची संमती नसताना ही छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे, अशी फिर्याद महिलेने नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात दिली.