पुणे: लोकसभा आणि विधानसभेच्या फॉर्म्युल्यानुसारच आगामी महापालिकेची निवडणूक महायुती लढणार आहे. महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ज्या जागा निवडून आल्या, त्या जागांसह 40 जागांसाठी आमचा आग्रह राहणार आहे. त्यामुळे पुण्याचा महापौर शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही, असे मत शिवसेना शहरप्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे यांनी व्यक्त केले.
सारसबागेजवळील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भानगिरे बोलत होते. या वेळी जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुनाईत, जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे आदी उपस्थित होते.
भानगिरे म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात शिवसेनेची पक्षबांधणी सुरू असून, विभागवार बैठका घेतल्या जात आहेत. पक्षासाठी अनुकूल असणार्या प्रभागांत सर्व्हे केला जात आहे. आगामी काळात महायुतीमधील व महाविकास आघाडीमधील नेते शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.
महापालिकेची निवडणूक युतीमध्ये लढायची की स्वबळावर, याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. त्यांच्या निर्णयानुसार आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. महायुती म्हणून निवडणूक लढत असताना 40 ते 50 जागांची मागणी आम्ही करणार आहोत, असेही ते म्हणाले.