...अन्यथा होणार थेट निलंबनाची कारवाई!आरोग्यमंत्र्यांनी घेतली अधिकार्‍यांची ‘शाळा’ Pudhari
पुणे

...अन्यथा होणार थेट निलंबनाची कारवाई!आरोग्यमंत्र्यांनी घेतली अधिकार्‍यांची ‘शाळा’

‘कामात पाप कराल, तर सर्वात जास्त निलंबनाची कारवाई आरोग्य विभागात होईल’, अशी तंबीही त्यांनी दिली.

पुढारी वृत्तसेवा

Pune News: प्रादेशिक मनोरुग्णालयातील अस्वच्छता, औंध जिल्हा रुग्णालयातून इतरत्र पाठवले जाणारे रुग्ण, आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार अशा विविध मुद्द्यांवर खडे बोल सुनावत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी अधिकार्‍यांची शाळा घेतली. ‘कामात पाप कराल, तर सर्वात जास्त निलंबनाची कारवाई आरोग्य विभागात होईल’, अशी तंबीही त्यांनी दिली.

आरोग्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर प्रकाश अबिटकर यांनी शुक्रवारी (दि.3) औंध जिल्हा रुग्णालय, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय, विश्रांतवाडीतील आरोग्य भवन या ठिकाणी भेट दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. आरोग्य विभागातील रिक्त पदे, शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव, डॉक्टरांचा कामाच्या तासांबाबत हलगर्जीपणा, अधिकार्‍यांची मनमानी अशा सर्व मुद्द्यांचा समाचार घेतला.

अबिटकर यांच्यासह आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, डॉ. कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते. बॉम्बे नर्सिंग कायद्यानुसार नोंदणीकृत रुग्णालयांनी तपासण्यांचे आणि उपचारांचे दर दर्शनी भागात लावावेत.

खासगी रुग्णालयांची पाहणी करावी, त्रुटी आढळल्यास कारवाई करावी, अशा सूचना अबिटकर यांनी दिल्या. आरोग्य विभागांतर्गत येणारी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय येथे रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले.

अधिकार्‍यांची खरडपट्टी

आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराचे वृत्त ‘दैनिक पुढारी’ने 2 जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांच्या मनमानीच्या मुद्द्याची दखल घेतली. ‘शासन अधिकार्‍यांना बक्कळ पगार देते. त्यांना स्वत:च्या कामाची जाण असली पाहिजे. आरोग्य विभागात एकाधिकारशाही चालणार नाही. अधिकारांचे विकेंद्रीकरण तातडीने झाले पाहिजे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल’, अशा शब्दांत त्यांनी अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली.

या मुद्द्यांवर झाली चर्चा

  • आरोग्य कर्मचार्‍यांच्या मेडिक्लेमची प्रक्रिया वेगवान करावी

  • मनुष्यबळ वाढवण्यासाठी इन्सेन्टिव्ह वाढवावा

  • सर्व शासकीय रुग्णालयांमधील स्वच्छता, सुविधांना प्राधान्य द्यावे

  • औंध रुग्णालयात पूर्ण वेळ हजर नसणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करावी

  • खासगी रुग्णालयांबाबत धोरण तयार करावे

  • सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT